विंदा जीवनगौरव पुरस्काराचा राज्य शासनालाच विसर दोन वर्षांपासून पुरस्काराची घोषणाच नाही

पुणे, दि. १९ – ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणार्‍या विंदा जीवनगौरव पुरस्काराचा राज्य शासनालाच विसर पडला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या पुरस्काराची घोषणाच झालेली नाही.

ज्ञानपीठ पुरस्कारविजेते ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या हस्ते पुण्यातील ८३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार होते. मात्र, संमेलनापूर्वीच विंदांचे आकस्मिक निधन झाले. काव्याचे दान भरभरून देणार्‍या विंदांचे हात घेऊनच ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन झाले. या संमेलनातील एका परिसंवादामध्ये सहभाग घेण्यासाठी आलेले तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी विंदांची स्मृती जागविण्यासाठी राज्य शासनातर्फे दरवर्षी एका ज्येष्ठ साहित्यिकास विंदा जीवनगौरव पुरस्कार देण्याची घोषणा केली. त्यानुसार ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांना पहिला विंदा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मुख्यमंत्र्यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून विंदा जीवनगौरव पुरस्काराची घोषणा केली होती. पुण्याच्या या संमेलनानंतर ठाणे आणि चंद्रपूर या ठिकाणी दोन संमेलने झाली. तर, आता चिपळूण येथे आगामी ८६ वे साहित्य संमेलन होणार आहे. मात्र, विंदा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्याचे राज्य शासनाला विस्मरण झाले आहे. साहित्य संमेलन हे वाङ्मयाचे सर्वोच्च व्यासपीठ असल्यामुळे हा पुरस्कार साहित्य संमेलनामध्येच प्रदान केला जावा, अशी सूचना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातफें करण्यात आली आहे. 

या संदर्भात साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे म्हणाल्या, विंदा जीवनगौरव पुरस्कार पूर्वी सांस्कृतिक विभागाकडे होता. मात्र, त्याची जबाबदारी आता भाषा विभागाकडे सोपविण्यात आली आहे. भाषा विभागातर्फे साहित्य महामंडळ आणि घटक संस्थांकडून या पुरस्कारासाठी नावे सुचविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार आम्ही नावे सुचविली आहेत.