तलाठयांचे लॅपटॉप झाले मुलांचे खेळणे!

सोलापूर, दि.१९ – गेल्या सहा महिन्यांपूर्वी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील तलाठयांना महसूल विभागाकडून लॅपटॉपचे मोठ्या थाटामाटात वाटप करण्यात आले होते. शेतकर्‍यांना जागेवरच त्यांचा सातबारा उतारा मिळावा, या हेतूने शासनाने ही योजना सुरू केली, परंतु सध्या या कर्मचार्‍यांचे लॅपटॉप त्यांच्या मुलांचे खेळणे बनल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

शासनाने मागील वर्षभरात राज्यभरातील हजारो तलाठ्यांना मोठ्या थाटामाटात लॅपटॉपचे वाटप केले. ज्या तलाठ्यांना लॅपटॉप दिले, ते तलाठी याचा काहीच उपयोग करीत नसल्याने हे लॅपटॉप निव्वळ शोभेची वस्तू बनले आहेत. काही तलाठ्यांचे लॅपटॉप त्यांची मुले वापरत असल्याचे आढळून येत आहे. हे सर्व पाहता तलाठी ऑनलाइन कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

लॅपटॉप दिलेल्या अनेक तलाठ्यांना संगणकाचे अजिबात ज्ञान नसल्याने त्यांचे लॅपटॉप त्यांच्या घरातील मंडळी वापरत आहेत. तर काहींचे घरात धूळखात पडून आहेत. एकाही तलाठ्याने ऑनलाइन डाटा केला नाही व त्याचा कधी वापर करण्याचा प्रयत्नही केलेला दिसत नाही. शेतकर्‍यांना व ग्रामस्थांना गावातील तलाठी कार्यालयात जावूनच विविध कागदपत्रे घ्यावी लागतात.