नीरेत ट्रक कोसळून ९ वारकर्‍यांचा मृत्यू

पुणे दि.१९-आषाढी वारीसाठी जाणार्‍या ९ वारकर्‍यांचा नीरा नदीत ट्रक कोसळल्याने झालेल्या अपघातात मृत्यू झाला असून सात वारकरी जखमी झाले आहेत. हा अपघात आज म्हणजे मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास झाल्याचे समजते. जखमींवर लोणंद येथील सावंत रूग्णालयात उपचार सुरू असून पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. मदत व बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.

या अपघातात ठार झालेले वारकरी बारामती तालुक्यातील कांबळेश्वर गावाचे आहेत. मृतात सात महिला आणि दोन पुरूषांचा समावेश असून दिंडी प्रमुख गणपती गोसावी याचा मृतांत समावेश आहे. तर उपचार सुरू असताना शहाजी शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाने अपघातात मरण पावलेल्यांना १ लाख रूपयांचे आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा केली आहे.