भंवरीदेवी प्रकरण – न्यायालयाबाहेर गोळीबार, आरोपी कैलास जाखड फरार

जोधपूर, १५ –  बहुचर्चित भंवरीदेवी हत्याकांड प्रकरणातील आरोपी कैलास जाखड गुरूवारी न्यायालयातून फरार झाला. यामुळे या प्रकरणाला नाटकी वळण आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी बिश्मरामही फरार होण्याच्या इराद्यात होता. परंतु त्यात तो अयशस्वी ठरला.

बिश्मराम आणि कैलास जाखडला न्यायालयात सुनावणीसाठी आणले होते. सुनावणी झाल्यानंतर दोघांना न्यायालयाबाहेर आणले जात असताना कोर्टाबाहेर उभी असलेल्या बोलेरो गाडीत बसलेल्या काही अज्ञातांनी हवेत गोळीबार केला. त्याचा फायदा घेत कैलास जाखड त्याच्या एका साथीदारासह पोलिसांना चकवा देऊन फरार झाला.

बोलेरोमधून झालेला गोळीबार हा कैलास जाखडच्या साथीदारांनी घडवून आणला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे.

पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली असून कैलास जाखडचा शोध घेतला जात आहे. या घटनेनंतर बिश्मरामला कारागृहात हलविण्यात आले आहे.

दरम्यान, जोधपूर येथील एएनएम भंवरीदेवी गेल्या वर्षी रहस्यमय रित्या गायब झाली होती. भंवरीदेवीची हत्या झाली असल्याचे सीबीआय चौकशीत स्पष्ट झाले होते. या हत्येप्रकरणी राजस्थानचे माजी मंत्री महिपाल मदेरणा अडचणीत सापडले आहे.