स्टीव्ह जॉब्जला होती मुलीच्या अपहरणाची भीती

वॉशिग्टन दि.१३- अॅपलचा सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्ज याला त्याच्या मुलीचे अपहरण केले जाईल या भीतीने १९८० सालात पछाडले होते असे पेंटॉगॉनने नुकत्याच जारी केलेल्या कागदपत्रात नमूद करण्यात आले आहे. याच कागदपत्रात स्टीव्ह त्याच्या तरुण वयात अमली पदार्थांच्या आहारी गेला होता तसेच स्पिडींग तिकीट काढले नसल्याने १९७५ सालात त्याचा तुरूंगवास थोडक्यात कसा टळला होता याचीही माहिती देण्यात आली असून ही सर्व नवी माहिती १९८८ सालच्या डॉक्युमेंटसमध्ये समाविष्ट करण्यात आली असल्याचे समजते.

संरक्षण तपास सेवांबरोबर कांही काम करत असताना जॉब्जने टॉप सिक्युरिटी किलअरन्ससाठी अर्ज केला होता. त्यावेळी तो पिक्सर संगणक फर्मचा प्रमुख होता. असा अर्ज जॉब्जने का केला होता याची माहिती नवीन कागदपत्रांत देण्यात आलेली नाही. मात्र जॉब्जच्या कंपनीचा गुप्तचर यंत्रणांशी संबंध येत असल्याने कदाचित हा अर्ज केला गेला असावा असे सांगण्यात येत आहे. त्यात जॉब्जने आपल्या विवाहबाह्य संबंधातून जन्मलेल्या मुलीचे पैशासाठी कदाचित अपहरण केले जाईल आणि त्याला ब्लॅकमेल केले जाईल अशी भीती व्यक्त केली आहे, तसेच तो तरूण वयात मारिजुआन, हशीश आणि एसएसडीच्या आहारी कसा गेला होता याचीही माहिती दिली गेली आहे.