पुणे, दि. १२ – महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून सुसाट दुचाकीवरून क्षणार्धात गायब होणार्या सोनसाखळी चोरांच्या टोळीला जेरबंद करण्याची कामगिरी हडपसर पोलिसांनी केली. गेल्या वर्षभरापासून या चोरांनी नागरीकांना हैराण करून पोलिसांच्या नाकी नऊ आणले होते. या टोळीमध्ये एका ‘बाईक रायडर’सह चार सोनसाखळी चोर आणि चार सराफाचांही समावेश आहे. त्यांच्याकडून २८ तोळे सोने आणि ४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. सोनसाखळी चोरांची टोळी पकडण्याची ही शहरातील पहिलीच वेळ आहे.
सहाय्यक पोलिसआयुक्त (वानवडी विभाग) व्ही.एस.पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रमाकांत जाधव हा या टोळीच म्होरक्या आहे. तो ‘फास्ट बाईक रायडर’ आहे. जाधव हा वरील चार आरोपींपैकी एकाला दुचाकीवर घेवून जावून सोनसाखळी चोरी करीत होता. चोरी केल्यानंतर दुचाकीवरून पसार होत. तसेच चोरीचे दागिने हडपसर, सोलापूर, उस्मानाबाद, आळेफाटा आदी ठिकाणच्या सोनारांना विकत. काही दिवसांपूर्वी वाघोली परिसरात संशयीतरित्या फिरत असताना जाधव याला हडपसर पोलीसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्याशी केलेल्या चौकशीतून या टोळीची माहिती समोर आली. या माहितीनुसार टोळीत उर्वरीत सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून सोनसाखळी चोरीसाठी वापरण्यात आलेल्या चोरीच्या चार दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच सराफांकडे विकलेले १४ लाख ५४ हजाराचे सुमारे २८ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
पालखी दरम्यान गर्दीचा फायदा घेत चोर्या करणार्या सात महिला ताब्यात
संत तुकाराम महाराजांच्या पालखी दरम्यान गर्दीचा फायदा घेत चोर्या करणार्या सात महिलांना निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी संबधित महिलांची चौकशी चालू आहे. पिंपरी – चिंचवड शहरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. या पालखी सोहळ्यात हौशे, नवशे आणि गवशे यांचा नेहमीच वावर असतो. वारकरी आणि भाविक यांच्याकडील सोनसाखळ्या, पाकीट चोरणारे भुरटे चोर सावज पाहात फिरत असतात. महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षासमोरच भुरट्या चोर्या करणार्या सात महिलांना साध्या वेशातील पोलिसांनी संशयावरून ताब्यात घेतले. भाविकांच्या या अलोट गर्दीत महिलांच्या गळ्यातील दागिने आणि मंगळसूत्राची चोरी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वारकर्यांनी दक्षता बाळगण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.