पाकव्याप्त काश्मीरचा ताबा भारताने परत मिळवावा – सरसंघचालक

नागपूर, दि. १२ – देशाला स्वातंत्र्य मिळून ६६ वर्ष लोटली आहेत. मात्र पाकिस्तानने काश्मीरचा बळकावलेला भूभाग आम्ही अद्यापही परत मिळवू शकलेलो नाही. ही बाब दुर्दैवी असून, केंद्र सरकारने पुन्हा एकदा या पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

रा.स्व. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात सुरू असलेल्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाचा समारोप सोमवारी सायंकाळी झाला. यावेळी देशाच्या कानाकोपर्‍यातून वर्गात सहभागी होण्यासाठी आलेल्या प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांना संबोधित करताना डॉ. भागवत बोलत होते. दै. पंजाब केसरीचे मुख्य संपादक अश्विनीकुमार यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुजरात प्रांत संघचालक आणि तृतीय वर्ष वर्गाचे सर्वाधिकारी डॉ. जयंतीभाई भागडिया आणि नागपूर महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या तासाभराच्या भाषणात डॉ. भागवत यांनी केंद्र सरकारने काश्मिर समस्येबाबत अभ्यास करण्यासाठी पाठविलेल्य संवादकांनी सादर केलेल्या अहवालावर टीका केली. हा अहवाल तयार करणारे हे देशाचे प्रतिनिधी आहेत की, पाकिस्तानचे असा सवाल करीत त्यांनी दिलेल्या अहवालाची सरसंघचालकांनी चिकित्सा केली. राज्यघटनेतील ३७० व्या कलमासंदर्भात संवादकांनी दिलेल्या मतांना विरोध करीत ३७० कलम काश्मिरसाठी लागू करण्याला घटनाकारांचा विरोध होता आणि तत्कालिन पंतप्रधानांच्या आग्रहाखातर हे लागू करण्यात आले होते, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. हे कलम टप्प्याटप्प्याने मागे घ्यायला हवे होते. मात्र तसे झाले नाही, असे डॉ. भागवत यांनी स्पष्ट केले.

आज देशाची स्थिती अतिशय गंभीर आहे. देशाची अखंडता, एकात्मता याबाबत राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकार्‍यांचे स्पष्ट धोरण नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून आज ६६ वर्ष झाली. एक विशाल आणि संपन्न देश म्हणून भारत जगभरात ओळखला जातो. तरीही पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका असे छोटे-छोटे देश आम्हाला धमकावतात. याला कारण आमच्या राज्यकर्त्यांमध्ये दूरदृष्टीचा अभाव आहे. त्यामुळेच देशाची अखंडता आणि एकता धोक्यात आली आहे, याकडे डॉ. भागवत यांनी लक्ष वेधले.

डॉ. आंबेडकरांनी देशाची घटना बनवताना देशाची अखंडता सामाजिक सौहार्द आणि सामाजिक शांतता कायम राहील, याकडे पूर्ण लक्ष दिले होते. मात्र त्यांचेच नाव घेत सत्ता काबीज करणार्‍यांनी संविधानाची मूळ दिशाच बदलली, असा आरोप त्यांनी केला. देशाच्या निर्मात्यांची अपूर्ण स्वप्ने जेव्हा राज्यकर्ते पूर्ण करीत नाहीत तेव्हा समाजाने एकजुटीने पुढे येवून ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागतो, असे ते म्हणाले. देशाच्या निर्मात्यांची ही अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठीच संघ प्रयत्यशील असून देशातील जनसामन्यांनी संघ कार्यात सहभाग द्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

डॉ. आंबेडकरांनी देशातील प्रत्येक नागरिकाला समान दर्जा दिला जावा असा आग्रह धरला होता. मात्र आता मतांसाठी एका विशिष्ट समाजाचे तुष्टीकरण केले जाते. पश्चिम बंगालमध्ये मौलवींचे वेतन वाढविले. हा जनतेचा पैसा आहे. करदाते हिंदूही आहेत. मग हा भेदभाव कशासाठी असा प्रश्न डॉ.भागवत यांनी यावेळी उपस्थित केला. हा देश बलवान करायचा असेल तर तुम्हालाच संपूर्ण ताकदीनिशी पुढे यावे लागेल. आपल्याला इतर कोणी मदत करतील, अशी आशा करू नये. दुर्बलता हा माणसाचा सर्वात मोठा दुर्गण आहे. देवही दुर्बलांना मदत करत नाही. यज्ञात बळी देण्यासाठी हत्ती किवा वाघाला आणले जात नाही, तर बकरी किवा कोंबडीसारख्या दुर्बलांनाच बळी दिले जाते, असे डॉ. भागवत यांनी नमूद केले. या देशातील प्रत्येक नागरिकाने स्वतः सक्षम होऊन हा देश सक्षम करण्यासाठी कटीबद्ध व्हावे लागेल, असे ते म्हणाले.

देशाची एकता व अखंडता कायम राखण्यासाठी नागरिकांनी पूर्ण शक्तीनिशी लढा देण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन पंजाब केसरीचे संपादक अश्विनीकुमार यांनी सोमवारी येथे केले. आपल्या भाषणात त्यांनी पंजाब केसरी वृत्तपत्रावर १९८० च्या काळात दहशतवाद्यांनी कसे हल्ले केले, दहशतवादीच्या हल्ल्यात माझे आजोबा व वडील हुतात्मा झाले. तरीही आम्ही दहशतवादाच्या विरोधात लढा सुरूच ठेवला. माझ्या शरीरात जोपर्यंत रक्ताचा थेंब बाकी आहे तोपर्यंत आम्ही दहशतवादाविरुद्ध लढा देतच राहू असेही त्यांनी स्पष्ट केले.