यंदा साखर कारखाने घेणार मुळासकट ऊस

सोलापूर, दि. १२ – ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये, अशी म्हण असली तरी यंदा साखर कारखाने मुळासकट ऊस घेणार असल्याने शेतकरीवर्गाचा फायदा होणार आहे. पावसाचे कमी प्रमाण, चाराटंचाईमुळे ऊसाचा चारा म्हणून केला जाणारा उपयोग; तसेच साखर कारखान्यांची वाढती संख्या, कारखान्यांच्या गाळप क्षमतेत झालेली वाढ यामुळे यंदा साखर कारखान्यांवर गाळपासाठी मिळेल तसा ऊस घेण्याची वेळ येणार आहे.

सध्या जिल्हयात भीषण पाणीटंचाईमुळे शेतकर्‍यांना ऊस जगवणे अवघड आहे. त्यातच चाराटंचाई जाणवत असल्यामुळे चार्‍यासाठी उसाचा उपयोग करण्यात येत आहे. कारखान्यांकडून उसाला मिळणार्‍या दरापेक्षा चार्‍यासाठी जास्त दर मिळत असल्यामुळे चार्‍यासाठी ऊस देण्यातच शेतकरी धन्यता मानत आहेत. परिणामी उसाच्या क्षेत्रात घट येणार आहे. शासनाचे शेतीपेक्षा पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले असल्याने उसाला पुरेसे पाणी मिळत नाही. परिणामी ऊसक्षेत्र कमी होण्याची शक्यता असल्याने चालू आर्थिक वर्षात साखर कारखाने अडचणीत येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी १८५० रुपये दर मिळावा म्हणून आंदोलन करण्यात आले होते. परंतु यावेळी मात्र कारखान्यांना जास्तीत जास्त दर देऊन गाळपासाठी ऊस घ्यावा लागेल अशी चिन्हे दिसत आहेत.