भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ज्या वृक्षाखाली गीतेचे ज्ञानामृत पाजले तो वटवृक्ष सध्या अखरेच्या घटका मोजत आहे. हरियानातील कुरूक्षेत्राजवळ असलेल्या ज्योतीसर येथील हा वृक्ष महाभारताचा एकमेव साक्षीदार असल्याचे मानण्यात येते. हा वृक्ष पाच हजार वर्षे जुना असल्याची भावना लोकांमध्ये आहे. मात्र कुरूक्षेत्र विकास बोर्ड आणि स्थानिक हिंदू मिशन या संस्थेच्या वादात हा वृक्ष सापडला असल्याने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे व परिणामी तो नामशेष होण्याच्या मार्गावर आहे असे समजते.
येथील अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या प्राचीन वृक्षाभोवती संगमरवरी फरशा बसविण्यात आल्याने त्याला पोषक मूल्ये मिळताना अडचण येते आहे. लोकांनी या झाडावर रात्री उजेड राहावा म्हणून लाईट खिळ्याने ठोकून बसविले आहेत. इच्छापूर्तीसाठी बांधण्यात येणार्या दोर्यांनी या झाडाच्या फांद्या अक्षरशः भरल्या आहेत. कांही फांद्या तोडल्याही गेल्या आहेत. हिंदू मिशन ही स्थानिक संस्था या वृक्षाची काळजी वर्षानुवर्षे घेत आहे मात्र कुरूक्षेत्र विकास बोर्डानेही या वृक्षावर हक्क सांगितला असून हे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट आहे.
कुरूक्षेत्र विकास बोर्डाचे क्युरेटर राजेंद्र राजा यांनी दिलेल्या माहितीनुसार सुंदरबनातून कांही तज्ञ या वृक्षाची पाहणी आणि जतन करावयासाठी करावयाच्या उपाययोजना यावर सल्ला देण्यासाठी नेमण्यात आले आहेत मात्र हिंदू मिशनच्या आडकाठीमुळे वृक्षसंगोपनासाठी ठोस उपाय करता येत नाहीत. पंजाब कृषी विद्यापीठातील तज्ञ डॉ.जगतर धिमन यांच्यामते झाडाभोवती केलेले बांधकाम झाडाचे योग्य पोषण होण्यास अपायकारक ठरत आहे. वटवृक्षाची मूळे हजारो एकरात पसरतात. त्यामुळे या मुळांना कीड लागू नये अथवा रोग पडू नयेत म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते. जुन्या फांद्या विशेष काळजी घेऊन तोडल्या तर नवीन फांद्या येऊ शकतात.
मात्र या वृक्षावर नक्की हक्क कोणाचा हे न्यायालयात ठरविले जाणार आहे व त्याला किती काळ जाणार हे निश्चित नसल्याने हा वृक्ष नामशेष होईल काय याची भीती भाविकांच्या मनात घर करून आहे.