विश्‍व साहित्य संमेलनाबाबत येत्या दोन दिवसात निर्णय

पुणे, दि. ९ – अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे चौथे विश्‍व साहित्य संमेलन ‘टोरांटो’ येथे होणार होते. याबाबत कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली होती. त्यावर येत्या दोन दिवसात आयोजकांशी निर्णायक चर्चा होणार आहे, अशी माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी दिली. विशेष म्हणजे, नुकत्याच पार पडलेल्या साहित्य महमंडळाच्या कार्यकरणीच्या बैठकीत विश्‍व साहित्य संमेलन आर्थिक कारणास्तव अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते. मात्र, चौथे विश्‍व साहित्य संमेलनाबाबत येत्या दोन दिवसात निर्णय होणार असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले.

टोरांटोच्या मराठी साहित्य महामंडळाने संमेलनासाठी निम्म्याहून अधिक तयारी केली आहे. संमेलनाचे स्थळ, राहण्याची, प्रवासाची सोय आदी बाबींची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. मात्र, या संमेलनास येणार्‍या खर्चाचा विचार करता त्यांच्यात आणि साहित्य महामंडळात थोडे मतभेद आहेत असे उषा तांबे यांनी सांगितले.

दरम्यान, चौथे विश्‍व साहित्य संमेलन येत्या ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान टोरांटो येथे होणार होते. संमेलनाचे अध्यक्ष म्हणून कवी ना.धों. महानोर यांचे नावही जाहीर करण्यात आले. कॅनडा येथील टोरांटोच्या मराठी भाषिक मंडळाने या संमेलनाच्या आयोजनाची धुरा हाती घेतली होती. यामुळे सुरवातीचे काही महिने टोरांटो येथील मंडळ आणि साहित्य महामंडळ यांच्यात चांगला समन्वय होता. परंतु, या संमेलनासाठी येणारा खर्च हा आपल्या आवाक्या बाहेर जात असल्याने टोरांटो येथील मंडळाने ‘हा खर्च एकट्या महामंडळाला झेपणारा नाही, साहित्य महामंडळाने हा खर्च विभागून घ्यावा’, असे पत्र पाठवले. यावर अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावर विश्‍व साहित्य संमेलनास जाणार तर सर्व साहित्यिक, नाहीतर कोणीच नाही’ अशी भूमिका महामंडळाने घेतली होती.