दर पाच वर्षांनी करावे लागणार सनदीचे नूतनीकरण

पुणे दि.७- वकीलांनी दर पांच वर्षांनी त्यांच्या सनदीचे नूतनीकरण करायलाच हवे असा ठराव बार कौन्सिल ऑफ इंडियाने नुकताच पास केला आहे.हा ठराव १ जून रोजीच पास करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. वकीलांनी खासगी नोकर्‍या किवा खासगी व्यवसायात व्यग्र राहू नये असा यामागचा खरा हेतू असल्याचे बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मदनकुमार मिश्रा यांनी सांगितले.

या ठरावानुसार वकीलांना सनदीचे नूतनीकरण करताना ६०० रू.शुल्क भरावे लागणार आहे. हे शुल्क सहा महिन्यांत भरायचे असून ते न भरणार्‍यांना देशात कुठेही वकीली करता येणार नाही. श्री.मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात फार मोठ्या संख्येने वकील सनद घेऊन खासगी नोकर्‍या अथवा खासगी व्यवसाय करत आहेत. त्यामुळे फक्त प्रॅक्टीस करणार्‍या वकीलांचे नुकसान होत असून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबविणे अवघड बनले आहे.

बार कौन्सिल ऑफ इंडिया ही शिखर संस्था असून नोंदणी करणे, परवाने देणे याचे अधिकार या संस्थेला आहेत. तसेच राज्यपातळीवरील बार कौन्सिल्स आणि वैधानिक संस्थांवरही या संस्थेचे नियंत्रण असते अशी माहिती बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे अध्यक्ष विठ्ठल कोंढे देशमुख यांनी दिली. ते म्हणाले की ठरावाची कॉपी मिळताच ती सर्व जिल्हा बार असोसिएशन्सकडे पाठविली जाईल. महाराष्ट्र व गोवा राज्यात सध्या १लाख २७ हजार वकील आहेत त्यांना सर्वांना सनद नूतनीकरण करून घेण्याबाबत सांगितले जाईल.