भ्रुणहत्येचे भयावह प्रमाण

महाराष्ट्राच्या विविध शहरांमध्ये गेल्या आठवडाभरात गर्भपात करून ते गर्भ उघडण्यावर टाकण्याचे काही प्रकार उघडकीस आले. त्यानंतर शासन कामाला लागले आणि हे प्रकार रोखण्यासाठी अधिक कडक उपाय योजण्याच्या दृष्टीने पावले पडायला लागली. या दुष्प्रवृत्तीचा प्रारंभ सोनोग्राफी यंत्रापासून होतो म्हणून सोनोग्राफी यंत्रे असणार्‍या डॉक्टरांच्यावर आणि रुग्णालयांवर कडक निगराणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली. आता तर सरकारने स्त्रीभ्रुणहत्या रोखण्यासाठी विशेष पथके नेमण्यात येतील, अशी घोषणा केली आहे. परंतु या व्यवसायामध्ये भरपूर पैसा कमावण्यास चटावलेल्या या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या डॉक्टरांनी कायदे, नियम आणि निर्बंध यातील सगळ्या पळवाटा शोधून आपला व्यवसाय सुरूच ठेवला. त्यासाठी आता काही डॉक्टरांनी एजंट नेमले आहेत, असे समजले. सरकारने निर्बंध कडक केले, त्यामुळे डॉक्टर घाबरले तर नाहीतच, पण अधिक खूष झाले. कारण या निर्बंधामुळे त्यांचा रेट वाढला. आता सरकार फार कडक नियम करत आहे तेव्हा गर्भपातासाठी जास्त पैसे द्यावे लागतील, असे म्हणून त्यांनी गर्भपाताचे रेट वाढवले.

बीड जिल्ह्यातील परळी-वैजनाथ येथील डॉ. सुदाम मुंडे यांनी धडाधड गर्भपात करण्याचा बेकायदा कारखानाच उघडला होता, असे लक्षात आले. वास्तविक पाहता गेल्या किमान १५ वर्षांपासून तरी मुलींची संख्या कमी होत असल्याच्या प्रकरणात चर्चा होत आलेली आहे. सर्वसाधारण लोकांची मनोधारणा विचित्र असते. त्यांना मुलगी नको असते. मुलगाच हवा असतो, कारण तो कुलदीपक असतो. या मनोधारणेतून अनेक महिला स्वतःहून गर्भाचे लिंगनिदान करून मुलगी असल्यास गर्भपात करण्यास प्रवृत्त होतात. एकदा ही प्रवृत्ती उघड झाली की, पैसा कमावण्यास चटावलेले डॉक्टर तिचा फायदा घेऊन भरपूर पैसे घेऊन लिंगनिदानही करतात आणि भरपूर पैसे घेऊन गर्भपातही करतात.यातून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि या समस्यांची चर्चाही भरपूर झालेली आहे. ही प्रवृत्ती नष्ट व्हावी यासाठी सरकारने १९९४ साली कायदा सुद्धा केलेला आहे. परंतु कायद्याने फारसे काही साध्य झालेले नाही. कारण या प्रकारामध्ये कोणी तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही. बाईलाच मुलगी नको असते आणि डॉक्टरला पैसे हवे असतात. त्यामुळे हा प्रकार बर्‍याच अंशी राजीखुशीने होत असतो. तेव्हा हा प्रकार रोखण्या-साठी प्रबोधन होणे आवश्यक आहे. अशा निष्कर्षाप्रत सर्वच लोक येऊन ठेपलेले आहेत.
 
प्रबोधन हा विषय तसा फार अवघड आणि वेळ खाणारा असतो. अशिक्षित लोकांपर्यंत प्रबोधनाचा संदेश लवकर जाऊन पोचत नाही आणि स्त्री गर्भाच्या हत्येचे हे प्रमाण अशा गरीब आणि अशिक्षित लोकांतच जास्त आहे. त्यामुळे गर्भपात करून घेण्यास उत्सुक असलेल्या महिला आणि त्यांच्या कुटुंबातील लोक यांचे प्रबोधन होणे फार अवघड आहे. असे असले तरी डॉक्टरांपर्यंत ते लवकर पोचू शकते. डॉक्टर हे सुशिक्षित असतात आणि समाजा-मध्ये निर्माण होणारी एखादी समस्या किती गंभीर आहे हे त्यांना लवकर समजू शकते. किंबहुना त्यांना ते लवकर समजावे अशी निदान अपेक्षा तरी असते. तेव्हा डॉक्टर लोक सावध झाले की ही समस्या लवकर सुटू शकेल, असे वाटले होते. एकदा डॉक्टरांनी लिंगनिदान करायचेच नाही आणि ते करून गर्भपात अजिबात करायचा नाही असा निर्धार केला की, ही समस्या सुटायला फार वेळ लागणार नाही. एवढे ते सोपे आहे. परंतु सुशिक्षित असणारी डॉक्टर मंडळी अगदी कळून सवरून या उद्योगामध्ये गर्क झालेली आहेत आणि अनेक सुदाम मुंडे महाराष्ट्राच्या गावांगावांमध्ये हा कसाई व्यवसाय करताना दिसत आहेत. पैशाचा मोह माणसाला सहजासहजी सुटत नाही आणि त्यातूनच अशी डॉक्टर मंडळी असे उद्योग करायला लागतात. परंतु शेवटी पैसा कमवताना सुद्धा माणसाच्या हव्यासाला कोठे तरी पायबंद घातला गेला पाहिजे. त्यांनी आपल्या मनानेच तो घातला पाहिजे.
 
पापाने पैसा कमवायचा पण तो कोणत्या मर्यादेपर्यंत, याचे भान त्याला असले पाहिजे. सुदाम मुंडे यांची मालमत्ता जाहीर झालेली आहे. ती पाहिली म्हणजे माणसाची पैशाची हाव कोणत्या मर्यादेपर्यंत जाऊ शकते आणि पैशाची नशा माणसाला काय काय करायला लावते हे दिसते. सुदाम मुंडे याने परळीमध्ये प्रचंड मोठे हॉस्पिटल उभारलेले आहे आणि गेल्या २५-३० वर्षांपासून तो सार्‍या महाराष्ट्रामध्ये गर्भपात करणारा डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहे. डॉक्टरी व्यवसाय हा अतिशय पवित्र व्यवसाय आहे. माणसाच्या शारीरिक वेदना दूर करण्याचे काम तो करत असतो. म्हणून त्याला देवदूत मानले जाते. मात्र या पवित्र व्यवसायामध्ये शिरून याच्या नेमके उलटे वर्तन करून एखादा डॉक्टर कोणत्या थराला जाऊ शकतो हे मुंडे यांनी दाखवून दिले आहे. त्याने या कसाईखान्याच्या जोरावर १६५ एकर जमीन विकत घेतलेली आहे आणि करोडो रुपये खर्च करून विविध शहरांमध्ये सदनिका विकत घेतल्या आहेत. या सदनिका आणि बँकेतल्या ठेवी यामुळे त्याला काय सुख मिळाले असेल ते त्यालाच माहीत.