
आय. टी. विषयी सर्वकाळ एक मोठा गैरसमज पसरवला जातो की या क्षेत्रात करीयर करण्यासाठी आधी इंजिनिअरिंग पदवी घेणे गरजेचे आहे. आय. टी. व्यवसायात नेहमीच सॉफ्टवेअर इंजिनियर असा शब्द वापरला जात असल्याने तर या गैरसमजाला चांगलेच बळ मिळते. या क्षेत्रात करीयरच काय पण साधा प्रवेश मिळवायचा झाला तरी निदान गणित, फिजिक्स आणि केमिस्ट्री हा ग्रुप घेतलेला विज्ञान पदवीधर असणे आवश्यकच असते. कारण आय. टी. म्हणजे ‘कॉम्युटर सायन्स.’ मग या क्षेत्रात सायन्स ग्रॅज्युएट लागणारच. हे नाही तरी निदान बी. टेक. होणे तर गरजेचे आहेच. वाणिज्य आणि कला पदवीधरांचे इकडे काही कामच नाही. बी. कॉम. आणि बी. ए. झालेल्यांनी आय. टी. कडे फिरकूसुद्धा नये. प्रत्यक्षात हे सारे गैरसमज माहिती तंत्रज्ञाना विषयीच्या काही भ्रमांतून आणि अज्ञानातून निर्माण झालेले असतात.
