ज्येष्ठी पौर्णिमा म्हणजे वट पौर्णिमा झाली की वेध लागतात पंढरीच्या विठूच्या दर्शनाचे. दरवर्षी अडीचशे किलोमीटरचे अंतर विठूच्या नामगजरात पायी चालत जाणारे वारकरी आणि ही पंढरीची वारी म्हणजे सातशे वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रात चालत आलेला सोहळा. या वारीचे गारूड काय असते ते वारी केल्याशिवाय कळणार कसे? मात्र गेली कांही वर्षे या वारीतील महिलांचा सहभाग ही वाढत चालला असून त्यामागची नेमकी कारणे काय असावीत, त्याचे स्वरूप काय अशा प्रश्नांचा वेध घेण्याचे काम यावर्षापासून सुरू करण्यात येत आहे. विश्वविद्यालयाच्या शाश्वती केंद्रातर्फ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे आणि तो प्रसिद्ध साहित्यिका अरूणा ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडला जाणार आहे.
सातशे वर्षांहून अधिक काळ चालत आलेली वारी म्हणजे महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे दर्शनच. आजपर्यंत या वारीवर अनेकांनी लिहिले, चित्रपटही निघाले आहेत. वारीतील व्यवस्थापन, सर्वसमावेशकता, शिस्त, लवचिकता या पैलूंवर अनेकांनी अभ्यासही केला आहे. त्यात मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. वारीतील स्त्री सहभाग या उपक्रमाविषयी डॉ.ढेरे म्हणाल्या की या वारीत ३५० ते ४०० दिंड्या दरवर्षी सहभागी होतात. प्रत्येक दिंडीत ४०० ते ३ हजार वारकरी असतात. दिंडीशिवाय वारी करणारेही लाखो वारकरी असतात. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा राज्यातूनही वारकरी येतात. गेली कांही वर्षे महिलांचीही संख्या लक्षणीयरित्या वाढत चालली असून त्यात केवळ ग्रामीण भागातील महिलाच नाहीत तर शहरी भागातील महिलाही आहेत. केवळ पायी वारीसाठी त्या येत नाहीत तर सेवा, व्यवस्थापन, उद्योग अशा अनेक कारणांनी त्या वारीत येतात. त्यात सुशिक्षित महिलांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे या महिलांच्या मुलाखती घेऊन त्यांसंबंधीच्या नोंदी या उपक्रमाअंतर्गत करण्यात येणार आहेत.
या उपक्रमासाठी समाजशास्त्रज्ञ, संशोधक तसेच विद्यार्थ्यांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. ही वारी पुणे सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातून जात असल्याने तेथील महिलांच्या मुलाखतींवर अधिक भर देण्यात येणार आहे असेही डॉ.ढेरे यांनी सांगितले.