मुंबई दि.६- भारतात घरांच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. गतवर्षात या किंमती तब्बल १२ टक्क्यांनी वाढल्या असून त्यामुळे आता जगातील ५३ देशांच्या यादीत भारताने घरांची किंमती वाढ यात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. ग्लोबल हाऊस प्राईस इंडेक्स साठी नाईट फ्रँक या स्थावर मालमत्ता सल्लागार कंपनीने हे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार ब्राझील मध्ये गतवर्षात घरांच्या किंमती सर्वाधिक वाढल्या असून ही वाढ २३.५ टक्के इतकी आहे. अधिकृत सरकारी स्टॅटीस्टीक आणि सेंट्रल बँक डेटावरून हे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
भारतातील घरांच्या किंमतीत होत असलेली वाढ ही जशी बांधकाम व्यावसायिकांसाठी चांगली बातमी आहे तशीच ती भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचेही द्योतक आहे असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. मात्र असे असले तरी परवडणारी घरे हे भारतीय शहरांच्या बाबतीत अजूनही स्वप्नच राहिले आहे. शहरात नोकरी व्यवसायानिमित्ताने होत असलेले स्थलांतर प्रचंड असून त्याचा भार शहरांवर पडतो. परिणामी शहरात घरे कितीही संख्येने उपलब्ध असली तरी ती कमी पडतात आणि शहरात दर जास्त असल्याने ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर राहतात. सॅटेलाईट टाऊन्स बांधणे, आजूबाजूच्या छोटया वसाहतींतून शहरात येण्यासाठी वेगवान आणि सोयीची वाहतूक व्यवस्था पुरविणे हे शहरांवर ओझे कमी करण्याचे मार्ग आहेत असेही या सर्वेक्षणात नोंदविण्यात आले आहे.
नाईट फ्रँक संस्थेचे राष्ट्रीय प्रमुख समंत दास यांच्या मते भोपाळ, गुवाहाटी यासारख्या टू टियर शहरात मुंबई, पुणे अशा शहरांच्या तुलनेत परवडणार्या दरांत घरे उपलब्ध होतात. जगभरात कांही देशांत घरांच्या किंमती वेगाने वाढत असल्या तरी सर्वत्र हेच चित्र नाही. विशेषतः युरोपिय देशांतील अस्थिरता आणि त्यामुळे त्या देशांच्या भविष्याबद्दल असलेली शंका यामुळे तेथे घरांचे दर कमी होताना दिसत आहेत.