भिवंडी, दि. ४ – परकीय आक्रमणांनी पिचलेल्या सर्वसामान्यांच्या मनातील स्वाभिमानाला फुंकर घालून स्वराज्य निर्माण कऱण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासमोर ठेवला आहे. स्वराज्यातील सर्वात लहान घटक देखील दुःखी राहणार नाही, याची काळजी शिवरायांनी घेतली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक देखील छत्रपतींचे हे कार्य पुढे नेऊन राष्ट्राला गतवैभव प्राप्त करून देतील, असा विश्वास रा.स्व.संघाच्या पश्चिम क्षेत्राचे बौद्धिक प्रमुख प्रा. शरद कुंटे यांनी व्यक्त केला.
रा.स्व.संघाच्या कोकण प्रांताचा प्रथम वर्ष संघशिक्षा वर्ग भिवंडीतील प्रेसिडेन्सी हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आला होता. या एकवीस दिवसीय वर्गात मुंबई, ठाण्यासह कोकणातील सर्व जिल्हे आणि गोवा राज्यातून एकूण १४५ स्वयंसेवक आले होते. या वर्गाचा समारोप आणि छ. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित हिंदूसाम्राज्य दिनाचा उत्सव शनिवारी पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून समाज कल्याण न्यासाचे अध्यक्ष सोन्या पाटील उपस्थित होते. या वर्गाचे कार्यवाह उत्तम आंबेकर, सर्वाधिकारी नंदा ओझे, कोकण प्रांताचे संघचालक बापूसाहेब मोकाशी आदी मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
भारतीय इतिहासाचा अभ्यास केला, तर अनेक लोकप्रिय राजांच्या अभिषेकाचे उल्लेख त्यात सापडतात. मात्र शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व या सर्व समारंभांपेक्षा वेगळे आणि मोठे आहे. सुलतानी आक्रमणानंतर सुमारे ९०० वर्षे आपला देश परकीयांच्या अधिपत्याखाली अक्षरशः भरडून निघाला होता. या परकीय आक्रमकांनी देवस्थाने आणि महिलांची विटंबना केली. देशातील जनतेला लुटले. सततच्या या आक्रमणांमुळे पिचलेल्या जनतेचा स्वाभिमान शून्यवत झाला होता. याच सुमारास परमेश्वरी कार्य म्हणून स्वराज्य स्थापनेचा धाडसी आणि यशस्वी प्रयत्न कऱणार्या शिवाजी महाराजांनी जनतेच्या स्फुलिंगाला नवी चेतना दिली. परकीय सत्ताधिशांचे वर्चस्व झुगारून त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा या सुवर्णेतिहासातील परमोच्च प्रसंग होता. शिवरायांचे चरित्र हे आजही देशप्रेमी व्यक्तींसाठी स्फूर्तीदायक ठरते आहे, असे प्रा. कुंटे यांनी सांगितले.
संघशिक्षा वर्गात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी यावेळी दंडयुद्ध (लाठीकाठी), निःयुद्ध (स्व-संरक्षण तंत्र), लेझीम, व्यायामयोगाची मनोहारी प्रात्यक्षिके सादर केली. स्वयंसेवकांनी सादर केलेले प्रदक्षिणा संचलन हा प्रेक्षकांच्या अपूर्वाईचा विषय ठरला. या वर्गात स्वयंसेवकांना शरिरीक, बौद्धिक, सामाजिक स्वच्छता, सेवाकार्ये, प्रथमोपचार, प्रचार आदी विषयांचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे वर्गाचे कार्यवाह आंबेकर यांनी सांगितले. समारोप कार्यक्रमातील प्रात्यक्षिके पाहण्यासाठी भिवंडीकरांनी या कार्यक्रमाला बरीच गर्दी केली होती.