पुणे, दि. ३ – हिंदू धर्मियांनाही जग जिंकायचे आहे पण ते तलवारीने किंवा धर्मांतराच्या माध्यमातून नाही, तर ते सेवा व प्रेम यांच्या माध्यमातून जिंकायचे आहे. संघाचेही तेच ध्येय आहे, असे रा.स्व.संघाचे गुजराथप्रांत संपर्क प्रमुख श्री. नितीन देवधर यांनी पुण्यातील तीन संघशिक्षावर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले. देशात अधांच्यासाठी मोठे काम केलेले पद्मश्री निरंजनभाई पंड्या हे प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. पुण्यात संघाचा प्रथम वर्ष वर्ग प्रथम वर्ग विशेष व द्वितीय वर्ष असे तीन वर्ग गेले तीन आठवडे सुरु होते. त्याला सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांचेही मार्गदर्शन लाभले होते. प्रथम वर्ष विशेष वर्गात ३०० स्वयंसेवक सहभागी झाले होते, तर प्रथम वर्षात १९१ स्वयंसेवक सहभागी झाले होते. द्वितीय वर्ष वर्गात १३५ शिबिरार्थी सहभागी झाले होते. हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे झाला. प्रारंभी शिबिरार्थींनी योग आणि संचलन यांची प्रात्यक्षिके केली त्याच प्रमाणे आज हिंदू स्वराज्य स्थापना दिन असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यारोहण समारंभही दाखवण्यात आला.
श्री देवधर म्हणाले, जगाच्या कानाकोपर्यातील प्रत्येक महासत्ता आणि निरनिराळे धर्म यांना कधी अर्थिक महासत्ता म्हणून अन्य प्रांतावर सत्ता करायची आहे तर काहींना तलवार वा धर्मांतर यांच्या माध्यमातून सत्ता करायची आहे; पण हिंदूंना `सर्वेपि सुखिन: संतु’ आणि `खळांची व्यंकटी सांडो’ अशा शिकवण्याच्या आधारे जग आपलेसे करायचे आहे. स्वामी विवेकानंद यांचा जेंव्हा सर्वधर्मपरिषदेतील विजयाचा अमेरिका दौरा झाला, त्यावर योगी अरविंद यांची प्रतिक्रिया अशी होती की, पाश्चात्य जगाला या युगात प्रथमच वेदांच्या संदेश समजत आहेत लवकरच सारे जग त्यातून जागे झाले तर आश्चर्य वाटायला नको.
श्री निरंजनभाई पंड्या आपल्या भाषणात म्हणाले, राष्ट्रउभारणीसाठी संस्कार आणि सेंवा यांचे व्रत घेऊन संघाचे स्वयंसेवक गेली ८७ वर्षे काम करत आहे त्यांच्या या देशपूजेला मी वंदन करतो. मी साधा एक अंध माणूस अन्य अंधांना शक्य तेवढी मदत करायची संधी आली तेंव्हा संघटनाला आरंभ केला आणि गेल्या पन्नास वर्षात एक लाख पन्नास हजार जणांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया केल्या व त्यांना दृष्टीप्राप्त झाली. संघाचे स्वयंसेवक आणि यातील समान धागा म्हणजे आम्हाला ‘अशक्य’ हा शब्दच कधी आढळला नाही. मला फक्त भारतातील पन्नास लाख अंधावर शस्त्र करून त्यांना दृष्टी परत द्यायची आहे कारण त्यांना शस्त्रक्रियेने दृष्टी मिळणार आहे पण संघाचे काम मोठे आहे त्यांना सारा देश उभा करायचा आहे माझे त्यांच्या कामाला विनम्र अभिवादन आहे.
प्रारंभी संघशिक्षावर्गाचे एक कार्यवाह प्रदीप सबनीस म्हणाले, संघाच्या प्रत्येक प्रांतात त्या त्या भागातील चाळीस वर्षापर्यंतच्या स्वयंसेवकांचा प्रथम वर्ग होतच असतो. पण गेल्या काही दिवसापासून अनेक क्षेत्रातील स्वयंसेवकांच्यासाठी विशेष प्रथम वर्ष वर्ग करण्यात येतो. यात सर्व जिव्ह्यातील स्वयंसेवक असतात. या सार्याच वर्गाला गेल्या वर्षीच्या तुलनेत चाळीस टक्के अधिक शिबिरार्थी आहेत. महानगर संघचालक बापूजी घाटपांडे यांनी प्रास्ताविक केले. या वर्गांना जुनागडचे जितेंद्रभाई पंड्या, नागपूरचे सुभाषचंद्र देशकर आणि कोल्हापूरचे आदिनाथराव पाटील हे त्या त्या वर्गाचे सर्वाधिकारी म्हणून उपस्थित होते.