
अकोला, दि. १ – महाराष्ट्रामध्ये १७ टक्के तर अमरावती विभागात केवळ ९ टक्केच शेती सिंचनाखाली आहे. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत देखील येथील शेतकरी उत्पादन घेतो. परंतु त्याच्या मालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. यासाठी केंद्र सरकारचे निर्यातबंदी धोरण जबाबदार असल्याचे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी आपल्याच शासनाला घरचा आहेर दिला. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शेतकरी चर्चासत्रात मुख्यमंत्री बोलत होते.
