अपयश हाच चांगला गुरू

यश हे चांगला गुरू असू शकत नाही तर अपयश हेच तुम्हाला अधिक चांगले शहाणे करू शकते. हा कुणा विचारवंताचा उपदेश नाही बरं का! आपला कोलकाता नाईट रायडर्स या आयपीएल विजेत्या संघाचा मालक शाहरूख खान याचे हे म्हणणे आहे.

कोलकत्यातील विजयोत्सव साजरा करून मुंबईत परतलेला शाहरूख सांगतो, यश आणि अपयश हा जीवनाचाच एक भाग आहे आणि या दोन्ही गोष्टी कायम राहणार्‍या नाहीत. गेल्या पाच वर्षांनी मला जे शिकविले आहे त्यातून शाहरूखलाही अपयश येऊ शकते, शाहरूख नापास होऊ शकतो हा धडा मी शिकलो आहे. नव्हे या अपयशानेच मी जास्त शहाणा बनलो आहे. गेली वीस वर्षे मी काम करतो आहे आणि मी खूप यश पाहिलेही आहे. मात्र करिअरच्या पीकवर असताना मला अपयश आले आणि त्यामुळे नवी दृष्टीही.

आयपीएल स्पर्धेत विजेते बनण्याचा आनंद आहेच पण हे माझे एकट्याचे यश नाही. सर्व टीम सदस्यांचाही त्यात मोठा सहभाग आहे. मॅच संपताच विजयोत्सव साजरा करण्याऐवजी आम्ही म्हणजे मी, सहमालक जुही व तिचे पती जय यांनी ही मॅच पुन्हा पुन्हा पाहण्याचा आनंद लुटला. माझी मुलगी सुहाना जेव्हा जेव्हा मॅच सुरू असताना येते तेव्हा तेव्हा आम्ही जिंकतो असे माझ्या लक्षात आले आहे. यावेळी ती अशीच आत आली आणि माझी आशा पालवली. अर्थात मी अंधश्रद्धाळू नाही. माझ्या मुलानाही मी नेहमी हेच सांगतो की कष्टाला पर्याय नाही. तुमचे हार्डवर्कच तुम्हाला यश देत असते.

जागतिक बुद्धीबळपटू विश्वनाथन आनंदने पाचव्यांदा विजेतेपद मिळविल्याबद्ल त्याचे अभिनंदन करून शाहरूख म्हणाला की बुद्धीबळ हा खेळ मुळात सोपा नाही आणि जगभरात पाच वेळा अजिंक्य राहणे हे त्यापेक्षाही अवघड आहे.