
मुंबई, दि. ३१ – सुमारे १२ हजार ५०० कोटी उलाढाल असलेल्या कल्याणी समूहातील भारत फोर्ज लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष २०१२ च्या चतुर्थ तिमाहीचे आर्थिक निष्कर्ष जाहीर केले आहेत. वित्तीय वर्ष २०१२ च्या चतुर्थ तिमाहीत भारत फोर्ज लि. (बीएफएल) कंपनीने १८.४ टक्के वाढीने ९,९१६ दशलक्ष रूपये उत्पन्न मिळविले आहे. यात निर्यातीतील २७.७ टक्के वाढीचे मोठे योगदान मिळाले आहे. या तिमाहीतील ढोबळ नफा २४.३ टक्क्यांनी वाढून तो २,६५४ कोटी रूपये झाला आहे. अपवादात्मक बाब म्हणून या वर्षी उत्तर अमेरिकेतील भारत फोर्ज कंपनीतील घसरलेली गुंतवणूक सुधारण्यासाठी ७०४ दशलक्ष रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
संपूर्ण उद्योग समूहाचा विचार केल्यास कंपनीच्या एकत्रिकृत उत्पन्नात संपूर्ण वर्षभरात यंदा २३.६ टक्के वाढ झाली असून ते ६३६८४ दशलक्ष रूपये झाले आहे. जागतिक स्तरावर व्यापारी वाहन क्षेत्रात मोठी मागणी आल्यामुळे कंपनीच्या उत्पन्नात यंदा लक्षणीय वाढ होऊ शकली आहे. तसेच भारतात वाहन व्यवसायाव्यतिरिक्त इतर व्यवसायात वाढ झाल्याचा परिणाम कंपनीच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होण्यावर झाला आहे. संपूर्ण वर्षभरात कंपनीने २७.२ टक्के वाढीने १०८५१ दशलक्ष रूपये ढोबळ नफा कमावला आहे.
