डिसेंबर जानेवारीत भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची शक्यता

चेन्नई दि.३०- बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्ड यांच्याच चेन्नईत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत या दोन्ही देशांत सामने खेळविले जाण्याबाबत विचार झाला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. २३ डिसेंबर २०१२ ते १० जानेवारी २०१३ दरम्यान हे सामने खेळविले जाणार असून हे सामने भारतातच होतील असेही समजते.
 
पाकिस्तानी क्रिकेट संघ सध्या मोकळा आहे तर भारतीय संघाला इंग्लंड बरोबर १५ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर या काळात कसोटी व टी २० सामने खेळायचे आहेत. त्यानंतर इंग्लंड संघ नाताळसाठी मायदेशी रवाना होणार असून ११ जानेवारीला १ सामना खेळण्यासाठी पुन्हा येणार आहे. दरम्यान भारतीय संघाला ब्रेक मिळणार आहे व त्यानंतर पाकिस्तानी संघाबरोबर तीन मर्यादित षटकांचे सामने किवा दोन एक दिवसीय सामने आणि एक टी२० खेळणे शक्य होणार आहे.

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत २००७ पासून मालिका खेळली गेलेली नाही. हे दोन्ही देश आशिया कप अथवा आयसीसी सामन्यांतूनच एकमेकांशी लढले आहेत. त्यामुळे ही मालिका खेळविण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.