
वद्यमान वाहनस्थिती आण पेट्रोल महागाईची स्थिती यात कायदा आणि सुव्यवस्था यांच्या दृष्टीने काही नवीन सूचना केली तर ती त्वरीत स्वीकारली जाणार नाही पण प्राप्त परिस्थितीत त्यावर गंभीरपणे विचार करावा लागणार आहे. अशी न स्वीकारली जाणारी सूचना म्हणजे स्कूटर व मोटारसायकलवर तीन व्यक्तींना बसायला परवानगी देणे. सध्याच रस्त्यावर अपघाताची संख्या वाढत असताना अजून दोन व्यक्तीच्या वाहनावर तीन व्यक्तींना बसायला परवागनी मागणे याला पोलीस तर आक्षेप घेतीलच पण जनतेतूनही त्याला प्रतिसाद मिळणार नाही. शहरी जीवनात बघितले तर उद्या पेट्रोलचा दर लीटरला शंभर रुपये झाला तरी नव्या मोटारी, मोटारसायकली आणि पेट्रोल यांची मागणी वाढलेली दिसेल. पण ही झाली शहरातील गर्दीच्या रस्त्यावरील निरीक्षणे पण सध्याचे जे दुष्काळ पिडीत तालुके आणि ते तालुके असलेले जिल्हे आहेत तेथील स्थिती बघितली तर सहा व्यक्ती बसू शकणार्या वडाप गाड्यातून दहा माणसे नेणार्या गाडया की ज्याला एसटीपेक्षा कमी दर पडतो, तो दर परवडत नाही म्हणून दहा दहा किमी पायी चालत जाणारांची मोठी संख्या बघितली की अजून सुचवावेसे वाटते की, एसटीबसमध्ये उभे राहून प्रवास करणारांना वीस पंचवीस टक्के कमी तिकीट घेतलेले चालणार असेल तर ग्रामीण भागातील लोकांची सोय होणार आहे.
आज मितीला पेट्रोलचा दर ८१ रुपये लीटर झाला आहे देशातील पन्नास टक्के जनतेला तो परवडणे शक्य नाही, त्यासाठी संकटकाळी जपान, चीन, रशिया मलेशिया यांनी मोटारसायकल व स्कूटर यावर तीन व्यक्तींना बसायला परवानगी दिली होती तशी परवानगी आपण देणे आवश्यक आहे. पहिल्या महायुद्धाच्या वेळी व दुसर्या महायुद्धाच्या वेळीही ब्रिटनने त्यांच्या कॉलनी देशात तीन सीटची मोटारसायकल पुरस्कृत केली होती, त्याची मॉडेल्स आज उपलब्ध आहेत.
चीनमध्ये आजही मोटारसायकलने ओढायची तीन माणसे बसू शकणारी रिक्षा आहे. भारत हा जरी वाहनाबाबत युरोप आणि अमेरिकेला आदर्श ठेवणारा देश असला तरी येथील ८१ टक्के जनता चीन, ब्रहमदेश, श्रीलंका, पाकिस्तान मलेशिया, ब्राझील आणि आफ्रीकेतील अनेक देश येथील जनतेने महागाई, दारिद्र्य यांच्या समस्या कशा सोडविल्या यांच्या प्रतिक्षेत असते. पुण्याच्या आजूबाजूला दहा लाख ते एक कोटी रुपये किमतीच्या मोटारी काढायच्या शंभर कंपन्यांनी आपले कारखाने काढले आहेत. पण साध्या स्कुटरवर घरातील व शेतातील छोटा पंप चालेल, मोटारसायकलच्या इंजिनच्या आधारे छोटा ट्रक्टर चालेल, अशी कल्पकता फारशी कोठे दिसत नाही.
सध्या राष्ट्रीय महामार्गावर हजारोच्या संख्येने वाहने जात असतात ते बघून असे वाटते की, या देशात कोठेही द्रारिद्र्य नाही. सगळीकडे कशी सुबत्ता आहे. पण जे लोक मोटारींचा वापर करतात ते प्रामुख्याने विदेशी कंपन्यांच्या कामाशी प्रत्यक्ष किवा अप्रत्यक्ष संबंधित असतात. पुण्यात सध्या एक लाख रुपये पगार मिळवणारांची संख्या कदाचित पंचवीस हजारावर गेली असेल पण साठ टक्के लोकांना महिन्याला दहा पंधरा हजारात पाच ते दहा माणसांचे कुटुंब चालवावे लागते. पुण्यात रस्त्यावर पडलेला कचरा उचलून त्यातील प्लॅस्टिक, काच बाटल्या, कागद या वस्तू सुट्या करून त्या विकणारांची संख्या एक लाख आहे. पुण्याच्या अवतीभवतीच्या टेकड्यावर रात्री अपरात्री बिअर, दारू पिणारांची संख्या हल्ली वाढली आहे, त्यातील भीषण वस्तुस्थिती अशी की, त्यांनी तेथेच फेकून दिलेल्या बाटल्यावर उपजीविका करणारे डबा वाटलीवाले पहाटे अडीच वाजल्यावरून दबा धरून बसलेले असतात. पुण्यात जी भाजी पन्नास रुपये किलो मिळते ती शेतकर्याकडून पाच ते दहा रुपये किलोत घेतली जात असते. त्यांना एसटीनेही पुण्याला पैसे वसुलीसाठी येणे परवडत नाही. निम्म्या पैशात त्यांना स्वारगेटपर्यंत पोहोचविणारे ट्रकवाले , टेम्पोवाले आणि सहा आसनी रिक्षा पहाटेची आपल्या ओळखीच्यांची एक ट्रीप बारा लोकांची करतात व थोडे पैसे कमी घेतात. वाहतूक पोलीस व आर टी ओ वाल्यांना चूकवून होणार्या प्रवासामुळे पुण्या भोवतालच्यांची काही लाख घरे चालत असतात.
गेल्या दहा वर्षात ग्रामीण भागात सायकलींची संख्या वाढली आहे पण अलिकडे छोट्या छोट्या कामासाठीही पंधरा वीस किमी जावे लागते. शिवाय शहरात दिवसभर काम करावे लागते. अशा वेळी यांच्यासाठी महागड्या पेट्रोल , डिझेलच्या काळातही शक्य ती व्यवस्था करून देणे आवश्यक आहे. शहरी वाहतुकीत पोलीस त्यांना परवानगी देणार नाहीत, तेथे अपघात वाढतील अशी त्यांची भीती रास्तही आहे पण मग तीन व्यक्तींनी मोटारसायकलवर कसे बसावे की त्यामुळे अपघात होणार नाहीत आणि त्यांना चार पैसे स्वस्तात प्रवास करता येईल. जगातील महासत्ता म्हणवणार्या अनेरिकेतही त्यासाठी प्रयोग केले गेले आहेत. गर्दीच्या काळात बसमध्ये दुप्पट माणसे घेण्यास परवानगी, मोटारसायकलीवर अधिकाधिक बोजा लादण्यासाठी काही अधिक सोयी असे प्रयोग झाले आहेत. भारतात आज मितीस त्याची गरज आहे. कारण येथे गरीबही राहतात याचा बरी परिस्थिती झाल्यावर विसर पडतो.
यातून आज मितीस येवढीच मागणी करता येईल की, स्कूटर रिक्षा, म्हणजे स्कूटर, मोटारसायकलने ओढायची रिक्षा, स्कूटर, मोटारसायकलवर तीन व्यक्तींना परवानगी मिळण्यावर विचार करायला हवा. पंचवीस वर्षापूर्वी पर्यंत रिक्षामध्ये दोन व्यक्तींनाच बसायला परवानगी असायची पण रिक्षांची रुंदी अडीच इंचांनी वाढवून तीन माणसांना परवनगी दिली तशीच काही परवागनी देण्याची कल्पना मायबाप सरकारने पुढे आणायला हरकत नाही.