
मुंबई, दि. २२ – निर्माता दिग्दर्शक नितिन देसाई यांच्या अजिंठा चित्रपटात बंजारा पारोचे पात्र दाखवताना बंजारा समाजाचा व भगवान गौतम बुध्दांचा घोर अवमान झाला आहे.

मुंबई, दि. २२ – निर्माता दिग्दर्शक नितिन देसाई यांच्या अजिंठा चित्रपटात बंजारा पारोचे पात्र दाखवताना बंजारा समाजाचा व भगवान गौतम बुध्दांचा घोर अवमान झाला आहे.
सेन्सॉर बोर्डाने चित्रपट प्रदर्शनास परवानगी न देण्याचे आश्वासन न पाळल्याने सेन्सॉर बोर्डाला जाब विचारण्यासाठी व बोर्ड रद्द करण्याच्या मागणीसाठी बंजारा, आदिवासी, भटके-विमुक्त सेन्सॉर बोर्डाला घेराव घालणार असल्याची माहिती प्रा. मोतीराज राठोड यांनी दिली. ते मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी लिलाबाई चव्हाण (महिला अध्यक्ष) कॉ. उल्हास राठोड, तुकाराम जाधव, सुनील गरूड, भौमसिंग पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
या चित्रपटात बंजारा समाजाचा घोर अवमान केला आहे. बंजारा समाजाचा नायक हा खलनायक दाखवला आहे. गौतम बुध्दांना देवाचा अवतार म्हटले आहे. डॉ. आंबेडकर यांच्या २२ प्रतिज्ञांना विरोध दर्शविला आहे. बंजारा समाजाच्या विरोधामुळे नितिन देसाई यांनी चित्रपटाच्या काही आक्षेपार्ह भाग वगळला. मात्र, अद्यापही आपण समाधानी नाही, असे मोतीराम राठोड म्हणाले.
सेन्सॉर बोर्डाने आमच्या तक्रारीनंतर चित्रपटास प्रमाणपत्र न देण्याचे दिलेले आश्वासन पाळले नाही. त्यामुळे आता सेन्सॉर बोर्डाला घेराव घालून जाब विचारणार असल्याचे लीलाबाई चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, अजिंठा चित्रपटाच्या विरोधात आम्ही दाखल केलेल्या याचिकेवर १३ जून रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे, असे लीलाबाई चव्हाण यांनी सांगितले.