बाबा रामदेव यांची आमिर खानवर टीका

नवी दिल्ली, दि. २१ – सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खान याच्या ’सत्यमेव जयते’ या कार्यक्रमावर योगगुरू बाबा रामदेव यांनी जोरदार टीका केली आहे. या कार्यक्रमाद्वारे स्त्री-भ्रूण हत्यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यापेक्षा पैसे कमविण्याचाच हेतू दिसून येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

बाबा रामदेव यांच्या मते, ’सत्यमेव जयते’ यासारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजसेवेच्या नावावर प्रायोजक मिळविण्याचा आणि टीआरपी वाढविण्याचा खेळ चालू आहे. टीव्हीवर कार्यक्रम सादर करणार्‍या आमिर खान यास केवळ साडेतीन कोटी रूपये कसे मिळतील, याची चिंता आहे.

आमिर खान याचा ’सत्यमेव जयते’ हा कार्यक्रम गेल्या तीन रविवारपासून दूरचित्रवाणीवरून प्रसारित करण्यात येत आहे. स्त्री-भ्रूण हत्या, बाल यौनशोषण, हुंड्याची कुप्रथा असे विषय आमिर खानने या कार्यक्रमाद्वारे हाताळले आहेत. या कार्यक्रमास दर्शकांचा प्रतिसादही मोठ्या प्रमाणात मिळाला आहे.

बाबा रामदेव म्हणाले की, लोक जेव्हा हुंडा घेण्याचे बंद करतील, तसेच माता, भगिनी, मुली यांचा सन्मान करण्यास शिकतील, तेव्हाच मुली वाचू शकतील. हुंडा देण्याच्या भीतीने मुलगी जन्मासच येऊ नये, असे काही लोकांना वाटते. अल्ट्रा साऊंड यंत्रणेचा गैरवापर रोखण्यासाठी कायद्याची अत्यंत कठोर अंमलबजावणी केली पाहिजे.