जुहू परिसरातील ओकवूड हॉटेलमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर रविवारी रात्री पोलिसांनी धाडटाकली. पोलिसांनी “रेव्ह पार्टी’त सामील झालेल्या सुमारे १०० तरुण-तरुणींना ताब्यात घेतले असून, त्यामध्ये “हाय प्रोफाइल’ तरुण, तरुणी तसेच विदेशी तरुणींसोबत “आयपीएल’मधील राहुल शर्मा आणि वेन पार्नेल हे दोन खेळाडू, तसेच एक अभिनेत्री आणि काही सेलिब्रिटींचा समावेश आहे.
या पार्टीतून सुमारे 110 ग्रॅम कोकेनसहित “एक्सएमडी’ व “एमसीएमडी’ हे इतर अमली पदार्थही हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.या “रेव्ह पार्टी’मध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा साठा सापडल्याने पोलिसांनाही धक्का बसला आहे. या पार्टीत सहभागी झालेल्या तरुण-तरुणींनी अमली पदार्थांचे सेवन केले आहे की नाही, हे तपासण्यासाठी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी कूपर रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यांचे रक्त व मूत्राचे नमुने तपासण्यात येत आहेत.
ज्यांच्या रक्ताच्या व मूत्राच्या नमुन्यामध्ये अमली पदार्थांचा अंश आढळेल; त्यांच्याविरोधात अमली पदार्थसेवन कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल, अशी माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. नांगरे पाटील यांनी पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक असताना 2007 मध्ये पुण्यातील सिंहगड परिसरातील रेव्ह पार्टीवर छापा टाकून 280 जणांना ताब्यात घेतले होते.
चंदन चौकीसमोर असलेल्या या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या “रेव्ह पार्टी’वर अतिरिक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम प्रादेशिक विभागाच्या पोलिस पथकाने कारवाई केली. ताब्यात घेण्यात आलेला वेन पार्नेल हा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे. त्यात विदेशी तरुणींचे प्रमाण अधिक आहे.