
मथुरा, दि. १९ – सुप्रसिद्ध संत बाबा जय गुरूदेव यांचे शुक्रवारी रात्री येथे निधन झाले. ते ११६ वर्षांचे होते. गेल्या काही काळांपासून आजारी असलेल्या बाबा जय गुरूदेव यांना गुरगाव येथील मेदांता इस्पितळात दाखल करण्यात आले होते. इस्पितळातून त्यांना येथील आश्रमात आणल्यानंतर काही तासांतच त्यांचे देहावसान झाले. बाबा जय गुरूदेव यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी तीन दिवस ठेवण्यात येणार आहे. बाबा जय गुरूदेव यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांचे लाखो समर्थक शोकाकुल झाले आहेत. तसेच त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी भक्तांनी येथील आश्रमात एकच गर्दी केली आहे.
बाबा जय गुरूदेव यांचे देश-विदेशात लाखो अनुयायी आहेत. त्यांचे बहुतांश अनुयायी हे ग्रामीण भागात राहणारे आहेत. भिंतीवर विविध घोषवाक्ये लिहून बाबा जय गुरूदेव हे आपल्या विचारांचा प्रचार करीत असत. त्यामुळे ते सर्व भारतभर प्रसिद्ध झाले होते. आणीबाणीच्या काळात त्यांनी वर्तविलेल्या राजकीय भविष्यामुळे ते चर्चेत राहिले होते. याच कारणावरून त्यांना २९ जून १९७५ रोजी कारावासात जावे लागले. बाबा जय गुरूदेव यांनी मथुरा येथे आपले गुरू घुरेलाल यांच्या स्मरणार्थ संगमरवरी साधना मंदिर उभारले आहे. या मंदिरात २०० फूट लांब व १०० फूट रूंद असे सत्संग सभागृह आहे. या सभागृहात एकाच वेळी ६० हजार लोक बसू शकतात.
