मुंबई, दि. १९ – ’देऊळ’ च्या अभूतपूर्व यशानंतर चित्रपट निर्माते अभिजीत घोलप यांनी आपल्या ’देविशा फिल्म्स’तर्फे ’ भारतीय’ चित्रपटाची निर्मिती करण्यास सुरूवात केली असून या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या जकीनपेठ या अतिदुर्गम गावात सुरू आहे. ’भारतीय’ या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते करीत आहेत. माझ्या आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांपेक्षा ’भारतीय’ चित्रपट सर्वात महत्वाकांक्षी चित्रपट आहे, असे सांगून दिग्दर्शक मोहिते म्हणाले की, सीमावादावरील ही कथा माझ्या मनात दोन वर्षांपासून घोळत होती व या कथेला निर्माते अभिजीत घोलप हेच न्याय देऊ शकतील, असे वाटले म्हणून त्यांच्या सहकार्याने हा चित्रपट पूर्ण करीत आहोत. या चित्रपटाची कथा व पटकथा अनिरूद्ध पोतदार यांनी लिहिली असून संवाद संजय पवार यांचे आहेत. संगीतकार अजय-अतुल यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे. तर गीतकार गुरू ठाकूर आणि संदीप खरे यांनी या चित्रपटातील गीतांची रचना केली आहे. मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, कुलदीप पवार, डॉ. मोहन आगाशे, ऋषिकेश जोशी, मिता सावरकर, स्मिता तळवलकर, उज्वला जोग, शुभांगी लाटकर, तेजश्री खेळे आदी कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.
