
इस्लामाबाद, ’नाटो’ राष्ट्रांची शिखर परिषद येत्या रविवारी शिकागो येथे होत असून त्या परिषदेस उपस्थित राहण्याचा निर्णय पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांनी घेतला आहे. या परिषदेत प्रामुख्याने अफगाणिस्तानातील परिस्थितीसंदर्भात चर्चा होणार आहे. ’नाटो’ शिखर परिषदेस जाण्यास पाकिस्तानी मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर राष्ट्राध्यक्षांनी परिषदेस उपस्थित राहण्याचे ठरविले आहे.
या परिषदेस उपस्थित राहण्याचे निमंत्रण ’नाटो’ देशांकडून पाकिस्तानला देण्यात आले होते. पण परिषदेस उपस्थित रहायचे की नाही, याबाबत पाकिस्तानची द्विधा अवस्था होती. गेल्या नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात २४ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याच्या घटनेनंतर पाकिस्तानने अफगाण सीमेवरील ’नाटो’ सैन्याचा रसदमार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. ही कृती करून त्यांनी ’नाटो’ सैन्याला एक प्रकारे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता.
’नाटो’ शिखर परिषदेचे निमंत्रण कोणत्याही अटी घालून नसावे, तसेच बंद करण्यात आलेले रसदमार्ग पुन्हा चालू करण्याची अटही त्यात नसावी यावर पाकिस्तान भर देत असला तरी, या दोन्हीचा खूप निकटचा संबंध असल्याचे अनेक जाणकार विश्लेषकांचे मत आहे.
