
पुणे, दि. १५ – मुलीसाठी होणार्या खर्चाचा विचार करून तिची गर्भातच हत्या करणे, ही अतिशय लाजीरवाणी गोष्ट आहे. महिला या अबला नाहीत त्या स्वयंभु आहेत, त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आता धैर्याच्या आधारे स्वता उभे राहणे गरजेचे आहे, असा सूर `नकोशी’ या गीताच्या अल्बमच्या प्रकाशनाच्या परिसंवादामध्ये उमटला.
स्त्री भ्रूण हत्या या विषयावर जनजागृती करण्यासाठी शिवसम्राट क्रिएशन्स तर्फे ‘नकोशी’ या गीतांच्या अल्बमचे आज ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी आयोजित परिसंवादामध्ये ज्येष्ठ सामाजिक कायकर्त्या विद्या बाळ, चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे, ज्येष्ठ कलाकार लीला गांधी आणि ऑटीझम तज्ञ पद्मजा गोडबोले यांनी स्त्री भ्रूण हत्येविषयी आपले मत व्यक्त केले. अल्बमचे गीतकार शाम निकम, संगीतकार हर्षित अभिराज, अजित शिरोळे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी विद्या बाळ म्हणाल्या, भारतासारख्या स्त्रीयांची महती सांगणार्या देशातच स्त्रीयांची संख्या घटत चालली आहे. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलणे आवश्यक आहे. मुलीला जन्म दिल्यानंतर तिचे शिक्षण आणि त्यानंतर लग्न या सगळ्या गोष्टींसाठी खूप खर्च येतो म्हणून जन्माला येण्याआगोदरच तिची हत्या करणे, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. मुलगा आणि मुलगी ही आपणच जन्मला घातलेली दोन माणसं आहेत. परंतु केवळ वंशाला दिवा पाहिजे म्हणून अनेक घरांमध्ये महिलांचा छळ होतो. त्यामुळे वंशाचा दिवा ही संकल्पनाच काढून टाकणे आवश्यक आहे.
लीला गांधी यांनी एक नृत्यांगना म्हणून आलेले अनुभव सांगितले. लावणी करणारी म्हणून माझ्याकडे लोक वेगळ्या नजरेने पहायचे. आज तर परिस्थिती फार भयानक आहे, पुरुषांच्या राक्षसी प्रवृत्तीमुळे मुलीला बाहेर पाठवायचे की नाही, असा प्रश्न पडतो. मुलीला स्वतंत्र माणूस म्हणून गृहीत धरलेच जात नाही, म्हतारपणाची काठी म्हणून मुलाकडे पाहिले जाते परंतु बर्याचदा मुलीच आई-वडिलांचा सांभाळ करताना दिसते, मग वंशाच्या दिव्यासाठी हट्ट कशासाठी करायचा? असा प्रश्न पद्मजा गोडबोले यांनी उपस्थित केला.
सुमित्रा भावे म्हणाल्या, प्रत्येक स्त्री स्वताला अबला न समजता ताकदवान समजते. ती स्वताचे जीवन न पाहता समअजकारणही समजून घेत असते. कुंटुबे, समाजातील अर्थकारण आणि पुरुषप्रधान संस्कृतीच तिला अबला बनविण्यासाठी जबाबदार असते. अभिनेता अमिर खान यांनी सुरु केलेला `सत्यमेव जयते’ यासारख्या कार्यक्रमांचा जनजागृतीसाठी निश्चीतच उपयोग होत आहे, असेही भावे यांनी नमूद केले. स्त्री भ्रूण हत्या करणार्या आईसह वडील, डॉक्टर आणि घरातील इतरांना कठोर शिक्षा द्यावी, असे पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी सांगितले. पूर्वीपासून चालत आलेल्या संस्कृती, रुढी यांचा हा दोष आहे, या रुढींचा नाश होणे आवश्यक आहे. केवळ जनजागृतीने संस्कृती बदलत नाही, त्यासाठी क्रांती व्हावी लागते. परंतु आपण निष्क्रांतीकडे जात आहोत, अशी खंत मंगेशकर यांनी व्यक्त केली.
