
मुंबई दि.१५- भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद देणारे प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांचे भारतातील पहिले हॉटेल दिल्ली येथे पुढील वर्षात सुरू होणार असल्याचे समजते.
आशा भोसले आणि त्यांचे चिरंजीव आनंद यांनी दहा वर्षांपूर्वीच“आशाज रेस्टॉरंट प्रा.लिमिटेड” या नावाने हॉटेल व्यवसायाची मुर्हूतमेढ रोवली होती. मात्र खास भारतीय पदार्थांचे हे रेस्टॉरंट त्यांनी दुबईत सुरू केले होते. त्यानंतर आबूधाबी, कतार,कुवेत, बहारीन, इजिप्त, ब्रिटन या देशांतही या कंपनीच्या शाखा काढण्यात आल्या. विशेष म्हणजे आशाताईंनी स्वतःच्या खास रेसिपीज या हॉटेलांतून उपलब्ध करून दिल्या आहेत. जगभरात भारतीय पदार्थांची खासियत कळावी यासाठी आपण या उद्योगात उतरल्याचे त्यांनी सांगितले होते.
या विषयी माहिती देताना त्यांचे चिरंजीव व हॉटेल चेनचे व्यवस्थापक आनंद भोसले म्हणाले की आता भारतातही आम्ही ही चेन सुरू करत असून त्यातील पहिले हॉटेल दिल्लीत पुढील वर्षात सुरू केले जाईल. त्यानंतर पाच वर्षात देशात १५ हॉटेल्स सुरू करण्याचा मानस आहे. पहिले हॉटेल दुबई येथे सुरू केले कारण दुबई ही हॉटेल व्यवसायासाठी अतिशय आदर्श जागा आहे .येथे देशविदेशातून सतत प्रवासी येत असतात.दुबईत आम्ही चांगले पाय रोवले आहेत आणि आता मायदेशात येण्यास उत्सुक आहोत.
