बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कृषी विभागासाठी पाच हजार कोटी रूपये – रत्नाकर गायकवाड

पुणे, दि. १४ –  आगामी १२ व्या पंचवार्षिक योजनेत कृषी विभागासाठी पाच हजार कोटी रूपये उपलब्ध होतील, अशी माहिती मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांनी दिली. पुण्यात यशदा येथे दोन दिवसीय राष्ट्रीय कृषी विकास योजना कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  
    शासनाच्या अन्य विभागांनी शेतकर्‍यांच्या उन्नतीसाठी प्रकल्प तयार करताना अल्पावधीत आर्थिक मोबदला व रोजगार निर्मिती करणार्‍या प्रकल्पांना प्राधान्य द्यावे, असे गायकवाड यांनी सांगितले. तसेच उत्पादन प्रक्रिया, वाहतूक, शीतगृहे यांची उभारणी कृषी उत्पादन होणार्‍या भागातच करावी, अशी सूचना गायकवाड यांनी यावेळी बोलताना केली. राज्यातील कृषी विकासाचा दर ४ टक्क्यांपर्यंत वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखल्या जात आहेत. मात्र, राज्यात पडणार्‍या पावसावर विकासाचा दर अवलंबून आहे.
    कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव सुधीरकुमार गोयल म्हणाले, राज्यातील ३३ जिल्हयांचा कृषी आराखडा तयार झालेला आहे. त्यानुसार नियोजन व अंमलबजावणी झाली पाहिजे. प्रकल्प तयार करताना ५ टक्के खर्च येतो, असे प्रकल्प यशदाच्या माध्यमातून तयार व्हावेत.
    यावेळी ८४ हजार पाली सुक्तांचे मराठीत भाषांतर करण्याच्या प्रकल्पाबाबतची बैठक सचिव रत्नाकर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पाली व संस्कृत बौद्ध ग्रंथांचे मराठी भाषांतर, संपादन त्याचप्रमाणे पाली व बौद्ध संस्कृत शब्दकोष तयार करण्यासंबंधी कार्यक्रमाची दिशा बैठकीत ठरविण्यात आली.