यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यातीत लक्षणीय वाढ

पुणे दि.१६- यंदाच्या हंगामात राज्यातून ३६६९१ टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली असून हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत १३ हजार टनांनी जादा आहे. विशेष म्हणजे आयातीत नेदरलँडचा प्रथम क्रमांक आहे. त्यांनी यंदा २१०३६ टन द्राक्षे आयात केली आहेत.
  दोन वर्षांपूर्वी युरोपियन युनियनने द्राक्षांवर रसायनांचे प्रमाण जादा असल्याचे कारण सांगून महाराष्ट्रातील द्राक्षउत्पादकांची द्राक्षे नाकारली होती व परिणामी द्राक्ष उत्पादकांना मोठे नुकसान सोसावे लागले होते. त्यानंतर दोन वर्षे या शेतकर्‍यांनी स्थानिक बाजारातच द्राक्षे विकायला प्राधान्य दिले होते. तर कांहीनी बांग्लादेश, गल्फ देशांत निर्यात केली होती. कांही द्राक्षे रशिया व अतिपूर्वेकडील देशांनाही पाठविण्यात आली होती.
   साधारणपणे डिसेंबरपासून द्राक्षांची निर्यात सुरू होते आणि ती युरोपियन बाजारपेठेत फेब्रुवारीत पोहोचतात. मे पर्यंत निर्यात सुरू राहते. कृषी विभागाच्या प्रक्रिया आणि नियोजन विभागाचे संचालक पांडुरंग वाठारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा ३६६९१ टन द्राक्षे युरोपियन युनियला निर्यात करण्यात आली. टेस्टींग लेव्हलला यंदा द्राक्षे नाकारण्यात आली नाहीत.दोन वर्षांपूर्वी  सँपललाच नाकारण्यात आलेल्या द्राक्ष बागायतदारांचा आकडा ३९०४ होता तो यंदा ३०० वर आला आहे.
 यंदा प्रामुख्याने कांही बड्या वाहनक्षेत्रातील कंपन्या द्राक्ष निर्यातीत उतरल्या आहेत. अॅग्रो बिझिनेसमध्ये उतरलेल्या या कंपन्यानी गुंतवणूकही मोठी केली आहे. एका बड्या कंपनीने ४३१० तर दुसर्‍या कंपनीने ४१०४ टन द्राक्षे निर्यात केली आहेत. महाग्रेपचा निर्यातीत १७ वा क्रमांक असून त्यांनी ४८६ टन द्राक्षे निर्यात केली आहेत. खासगी कंपन्याचे स्वतःचे नेटवर्क आहे, त्या आर्थिक दृष्टया भक्कम आहेत. त्यामुळे नुकसान सोसण्याची त्यांची क्षमताही अधिक आहे. छोट्या शेतकर्‍यांना ते शक्य होत नाही असेही ते म्हणाले.
 यंदा आंध्रातूनही १९७ टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. निर्यात द्राक्षांना किलोला ४० रूपयांपर्यंतचा भाव युरोपियन युनियन देशात मिळतो तर अन्य देशांत तो ३० रूपयांवर असतो. अर्थात स्थानिक बाजारापेक्षा हा दर अधिकच असतो. द्राक्ष बागायतदाराला हेक्टरी ३ लाख रूपये गुंतवणूक करावी लागते व त्यातून १० टन द्राक्षे मिळू शकतात असेही त्यांनी सांगितले.