
नवी दिल्ली/चेन्नई दि.१४- भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी पण सत्यम घोटाळा प्रकरणात सध्या तुरूंगाची हवा खात असलेले रामलिंग राजू यांचे स्थान कार्पोरेट क्षेत्रासाठी कितीही खालवले असले तरी त्यांनी डिझाईन केलेल्या आपत्कालिन सेवा अॅम्बुलन्स मॉडेलला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे.
अमेरिकेतील इमर्जन्सी सेवेसाठी असलेल्या ९११ नंबरप्रमाणेच रामलिंग राजू यांनी सार्वजनिक व खासगी सहकार्यातून हे इमर्जन्सी अॅम्बुलन्स सेवा मॉडेल सात वर्षांपूर्वीच विकसित केले असून त्याला देशातील ११ राज्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. २००५ साली रामलिंग राजू यांनी ईमर्जन्सी मेडिकल अॅन्ड रिसर्च इस्टिट्यूट या स्वयंसेवी संस्थेसाठी ही सेवा सार्वजनिक व खासगी सहकार्यातून सुरू केली होती. राजू सत्यम घोटाळा प्रकरणात तुरूंगात गेल्यानंतर ही सेवा कंपनी जीव्हीके ग्रुपने २००९ साली घेतली होती.
जीव्हीके इएमआरआय चे प्रमुख अधिकारी बी.एन. श्रीधर याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की उत्तर प्रदेशने पुढील वर्षात आमच्या १८०० अॅम्बुलन्स त्यांच्या आत्ताच्या ३१४७ अॅम्बुलन्सच्या ताफ्यात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. १०८ हा नंबर आरोग्य सेवेसाठी पॅन इंडिया सेवा म्हणून लवकरच नोंदला जाणार आहे. या नंबरवर कॉल केल्यानंतर तुम्हाला अॅम्बुलन्सची सेवा मिळू शकणार आहे. या नव्या अॅम्बुलन्स चोवीस तास सेवा देणार आहेतच पण त्यात रूग्णालयाची उपलब्धता, अपघाताची केस असल्यास पंचनामे वगैरे प्रकारातून चटकन सुटका होऊन जखमींना त्वरीत उपचार मिळावेत यासाठी पोलिस कक्षाशी संदेश दळणवळणाची सोय याही सुविधा आहेत. मेडिकल अथवा आग अशा आपत्कालिन आणीबाणीसाठी ही सेवा मिळू शकणार आहे.
विशेष म्हणजे या १०८ नंबरवर सेवा देणार्या अॅम्बुलन्समध्ये मध्यवर्ती राज्यस्तरीय डेटा बेस उपलब्ध असणार असल्याने आणीबाणी ट्रेक करणे त्यामुळे सुलभ होणार आहे. सध्या आंध्र, कर्नाटक, तमीळनाडू, मध्यप्रदेश, गोवा,केरळ राज्यात ही सेवा उपलब्ध असून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत यासाठीचे अनुदान देण्यात येणार आहे.
देशभरात ही सेवा बहुसंख्य राज्यांनी स्वीकारावी यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यासाठी राज्य सरकारांनी दरवर्षी ५० ते ८० कोटी रूपयांची तरतूद करणे अपेक्षित असल्याचेही श्रीधर यांनी सांगितले.
