कॉर्पोरेशन बँकेच्या कामगिरीत सुधारणा

मुंबई, दि. १४ – सार्वजनिक उद्योगात कॉर्पोरेशन बँकेने ३१ मार्च २०१२ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात १५०६ कोटी चार लाख रूपयांचा निव्वळ नफा कमाविला आहे. ३१ मार्च २०११ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत या नफ्यात ६.५६ टक्के इतकी वाढ झाली आहे. बँकेने २८५५ कोटी ९७ लाख रूपयांचा ऑपरेटिंग नफा कमविला आहे. यात ११.८२ टक्के वाढ झाली आहे. बँकेने दोन लाख ३६ हजार ६११ कोटी रूपयांचा एकूण व्यवसाय केला. यात १६.२१ टक्के वाढ झाली. एक लाख ३६ हजार १४२ कोटी रूपयांच्या ठेवी जमा करून यात १६.६१ टक्के वाढ केली आहे. बँकेच्या एकूण ठेवींशी बचत व चालू खात्यातील ठेवींचे प्रमाण २२.१२ टक्के होते. एक लाख ४६९ कोटी रूपयांची कर्जे बँकेने दिली आहेत. यात १५.६८ टक्के वाढ झाली. यात ७१४० कोटी रूपयांची शेतकी कर्जे दिली. २०१२ मार्च अखेर दिलेल्या शेती कर्जांत मार्च २०११ च्या तुलनेत २९.५२ टक्के वाढ झाली. लघु व मध्यम उद्योगांना १४३४० कोटी रूपयांची कर्जे दिली. बँकेच्या एकूण कर्जाशी प्राधान्य तत्वाने द्यावयाच्या कर्जाचे प्रमाण ३४.७० टक्के होते. बँकेने प्रत्येक कर्मचार्‍यामागे १७.१३ कोटी रूपयांचा व्यवसाय केला. प्रत्येक शाखेमागे १५७.७४ कोटी रूपयांचा व्यवसाय केला.
 बँकेच्या १५०० हून अधिक शाखा आहेत. १२७४ एटीएम कार्यरत आहेत. गेल्या आर्थिक वर्षी बँकेने १३९ शाखा उघडल्या असून २४ एटीएम कार्यरत केले.
दरम्यान, ३१ मार्च २०१२ अखेर संपलेल्या तिमाही अखेरीस या बँकेने ३५१ कोटी २६ लाख रूपयांचा निव्वळ नफा कमविला. या तिमाहीत बँकेने ६९ नव्या शाखा उघडल्या आहेत.

Leave a Comment