
पुणे, दि. १२ – भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह व्यंग्यचित्र एनसीआरटीच्या पुस्तकात समाविष्ट केल्याप्रकरणी काल राज्यसभेत झालेल्या गदरोळ झाला. त्याचे पडसाद पुण्यातही उमटले. एनसीआरटीचे सल्लागार व पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख सुहास पळशीकर यांच्या कार्यालयाची आज चार तरुणांनी तोडफोड केली . तसेच पळशीकरांच्या निषेधार्थ घोषणा बाजी केली. त्यामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली.
घडलेल्या प्रकाराबाबत पळशीकर यांनी पत्रकरांना सांगितले की, राज्यसभेत झालेल्या वादाची पार्श्वभूमी समोर ठेवून दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चार तरुण विद्यापीठातील राज्यशस्त्र विभागात त्यांच्याबरोबर मी माझ्या कार्यालयात काही मुद्द्यांवर चर्चा केली; मात्र त्यांनी अचानक माझ्या निषेधार्थ घोषणा देत कार्यालयाची तोडफोड केली तसेच तोडफोड केलेल्या साहित्यावर शाई फेकली. मला इजा पोहचिण्याचा त्यांना कोणताही हेतू नव्हता. त्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये असे मला वाटते. ज्या संघटनेच्या नेत्यांनी या तरुणांना हे कृत्य करायला लावले त्यांची व या तरुणांची समजूत काढणे आवश्यक आहे असे मला वाटते.
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अनुयायी व चाहता आहे. त्यांचा अवमान करण्याचा कोणताही उद्देश माझ्या मनात नाही. पुस्तकात आंबेडकर यांच्या विषयीचे व्यंग्यचित्र समाविष्ठ करून आम्ही काही चूक केली असे वाटत नाही. विद्यार्थ्यांना छायाचित्र, व्यंगचित्र, तसेच वेगवेगळ्या माहितीच्या आधारे राज्यशास्त्र विषय समजावा हा आमचा प्रयत्न होता; मात्र आम्ही जे केले बरोबरच आहे . असे कोणी मानू नये. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. त्यामुळे हा चर्चेचा विषय आहे. असेही पळशीकर यांनी सांगितले.
एनसीआरटीचे पुस्तक २००६ मध्ये प्रसिद्ध करण्यात आले; मात्र २०१२ मध्ये त्यावरून राज्यसभेतही अचानक चर्चा का केली गेली हा प्रश्न मला अद्याप उमगला नाही. मी तोडफोड करणार्यांच्या विरोधात तक्रार करणार नाही; तर विद्यापीठ प्रशासन याबाबत निर्णय घेईल. मला राज्य शासनाने सुरक्षा व्यवस्था दिली असून पोलिसांच्या सल्ल्यानुसार सुरक्षा व्यवस्था स्वीकारण्याचा निर्णय मी घेणार आहे, असेही पळशीकर म्हणाले.
