
नवी दिल्ली दि.११- केरळमध्ये यंदाही मान्सूनचे आगमन जूनमध्येच होणार आहे मात्र तो जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये बरसेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे. वेधशाळेचा अधिकृत अंदाज वर्तविण्यास अद्यापी आठवडाभर असतानाच हा अंदाज वर्तविला गेला आहे. आयएमडीचे महासंचालक एल.एस.राठोड यांनी हा अंदाज देतानाच सतत तिसर्या वर्षात पीकपाणी उत्तम येणार असल्याचेही नमूद केले आहे. पीकपाणी उत्तम झाले तर अन्नधान्यांच्या दरवाढीला आपोआपच आळा बसणार आहे.
केरळला जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचे आगमन होणार आहे मात्र त्यात एक-दोन दिवस इकडेतिकडे होऊ शकतात असेही राठोड म्हणाले. मान्सूनच्या उत्तरार्धात मात्र एल निनोचा प्रभाव जाणविण्याची शक्यता असून त्यामुळे २००९ प्रमाणे ऑगस्ट सप्टेंबरच्या काळात मान्सून कदाचित बरसणार नाही. गेली १०० वर्षे केरळात मान्सूनच्या आगमनाची तारीख १ जून हीच धरून अंदाज दिले जातात. भारतातील ६० टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे आणि भारतात शेती हा ५८ दशलक्ष लोकांचा रोजगारही आहे. त्यामुळे मान्सून हा भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा घटत असतो असेही राठोड म्हणाले.
महाराष्ट्रातील जमीन सध्या चांगली तापली आहे परिणामी तेथे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्यास अनुकुल परिस्थिती आहे. हे क्षेत्र उत्तरी राजस्थानकडे सरकते आहे आणि हे चांगले लक्षण आहे. यामुळेच पश्चिम किनारपट्टीवर दाबाचा पट्टा तयार होतो व पाऊस पडतो असे सांगून राठोड म्हणाले की शेतकर्यांना यंदा जूनजुलैत पेरणी करणे शक्य होणार आहे.
