एअर इंडिया वैमानिकांचा संप चालूच ; किंगफिशरचीही काही उड्डाणे रद्द

नवी दिल्ली, दि. ११ – एअर इंडियाच्या वैमानिकांनी चालू केलेले आंदोलन शुक्रवारी चौथ्या दिवशीही सुरूच असून त्यावर अद्याप तरी काही तोडगा दृष्टीपथात दिसत नाही. वैमानिकांच्या या आंदोलनामुळे एअर इंडियाची १२ आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली. तसेच हा संप लक्षात घेवून येत्या १५ मेपर्यंत तिकीट विक्री न करण्याचा निर्णयही एअर इंडिया व्यवस्थापनाने घेतला आहे. वैमानिक सामूहिकपणे आजारपणाच्या रजेवर गेल्याने वैमानिकांची उपलब्धता नसल्याने अमेरिका, युरोप, जेद्दा आणि रियाधला जाणारी आमची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, अशी माहिती एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिली.
  नागरी विमान वाहतूक मंत्री अजितसिंह यांनी सांगितले की, ’आजारी’ पडलेले वैमानिक लवकरच बरे होतील, अशी आशा आहे. एअर इंडिया कंपनी ही आजारी असली तरी, एअर इंडियाला अतिदक्षता विभागात दाखल करावे लागणार नाही, अशी आपणास आशा वाटते. इंधनाच्या वाढत्या किंमती, वाढता सेवाकर आणि अन्य आकारणीमुळे हवाई उद्योग व एअर इंडिया अत्यंत कठीण कालखंडातून वाटचाल करीत आहे. हा सर्व विषय आपण पंतप्रधानांकडे उपस्थित करणार आहोत.
एअर इंडिया ही कंपनी स्वतःच्या पायावर कशी उभी राहील, ती फायद्यात कशी चालेल, ही सध्याची मुख्य समस्या आहे. त्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सर्व कर्मचार्‍यांनी आणि कर्मचारी संघटनांनी सहकार्य करण्याची गरज आहे. एअर इंडिया अस्तित्वात राहण्यासाठी सर्वांनी शिस्त पाळण्याची अत्यंत गरज आहे. सर्व कामगार संघटनांनी व्यक्तिगत हितसंबंध बाजूला ठेवले पाहिजेत. कोणत्याही कामगार संघटनेशी चर्चा करण्याची आमची तयारी आहे. पण त्यांनी आपला संप आधी मागे घेतला पाहिजे. एअर इंडियाच संकटात सापडली, तर सर्वांना आपल्या नोकर्‍या गमवाव्या लागतील, असे नागरी विमान वाहतूकमंत्र्यांनी सांगितले. किंगफिशरबद्दल अजितसिंह यांना विचारले असता, किंगफिशर ही खाजगी कंपनी असून त्यांच्या समस्या त्यांनीच सोडवायच्या आहेत, असे ते म्हणाले.
 दरम्यान, वैमानिक संपावर गेल्याने किंगफिशरने शुक्रवारी आपली १२ उड्डाणे रद्द केली. पगार न दिल्याच्या निषेधार्थ किंगफिशरचे वैमानिक गुरूवारपासून आंदोलन करीत आहेत. या आंदोलनामुळे गुरूवारी किंगफिशरची १७ उड्डाणे रद्द करावी लागली होती.