अखेर रणबीर – करिना पडद्यावर एकत्र येणार

बॉलिवूडसाठी ८० वर्षांहून अधिक काळ योगदान देणारे पहिले घराणे म्हणून कपूर घराणे ओळखले जाते. कपूर बंधूंनी अगदी आत्तापर्यंत चित्रपटातून एकत्र कामे केली आहेत. मात्र कपूर घराण्यातील मुली पडद्यापासून कायम दूरच राहिल्या होत्या. ही प्रथा मोडली करिश्मा कपूरने. कपूर घराण्यातील चित्रपटात आलेली ही पहिली मुलगी. पाठोपाठ तिची बहीण करिनाने तर बॉलिवूड जणू व्यापूनच टाकले आहे. आज बॉलिवूडवर करिना आणि तिचा चुलत भाऊ रणबीर अक्षरश: सत्ता गाजवत असतानाच या दोघांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे ती `जिंदगी ना मिले दोबारा’ हा नितांत सुंदर चित्रपट देणार्‍या झोया अख्तरने.
    अर्थात करिना आणि रणबीर रोमॅटिक दृष्ये पडद्यावर कधीच देऊ शकणार नाहीत, याची जाणीव त्या दोघांप्रमाणेच चित्रपट निर्मात्यांना आहेच. म्हणजे त्यांना एकत्र आणायचे तर तसेच जबरदस्त स्क्रिप्ट हवे. झोयाने यात बाजी मारली असून बहिण-भावाच्या नात्यावरच आधारित चित्रपट ती बनविते आहे. या चित्रपटाची कथा तिने करिनाला `तलाश’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ऐकविली आणि करिनाने ताबडतोब हा चित्रपट करायला संमती दिली. रणबीरनेही होकार दिला आणि अशा रितीने प्रत्यक्षातले बहिण-भाऊ चित्रपटातूनही बहिण भावाच्या लीड रोलमध्ये चमकण्याचा मार्ग मोकळा झाला. या वर्ष अखेरी या चित्रपटाचे काम सुरू होणार असल्याचे समजते.