
नवी दिल्ली, दि. ९ – केवळ भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध असलेल्या आंध्रातील तिरूपती येथील वेंकटेश मंदिराला राष्ट्रीय संरक्षित स्थानाचा दर्जा देण्याचा विचार पुरातत्त्व विभाग करत असल्याचे समजते. हे संरक्षित क्षेत्र म्हणून नोंदले जावे असा प्रस्ताव आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडे आला असल्याचे व या पुरातन मंदिराची पाश्वर्भूमी, इतिहास व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन या प्रस्तावाचा विचार सुरू असल्याचे एएसआयचे उपसुपरिटेंडेंट के. के. शर्मा यांनी सांगितले.
आंध्रातील तिरूमला टेकडीवरील हे तिरूपती देवस्थान अतिशय पुरातन आहे. मात्र सध्या मंदिरात व्यवस्थापन समिती सर्व कारभार पाहात असून त्यांनी मान्यता दिल्यानंतरच हा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्रालयाकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला नक्की किती वेळ लागेल हे सांगता येणार नाही, असे शर्मा यांनी स्पष्ट केले. या मंदिरातील हजार खांबी मंडपम डिसमेंटल करण्यात आला आहे. तसेच गर्भगृहावरील बाहेरच्या भिंतींना सोन्याचे पत्रे बसविण्यात आले आहेत. वास्तविक या भिंतींवर प्राचीन शिलालेख आहेत. पुरातत्त्व विभागाच्या प्राचीन वास्तूंबाबत असलेल्या नियमांच्या हे विरोधात आहे. मात्र व्यवस्थापनाने अनंत स्वर्णमयम योजनेखाली हे बदल केले आहेत.
आंध्रातील प.गोदावरी जिल्ह्यातील बीकेएसआर अय्यंगार या सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती अधिकार हक्काखाली पुरातत्त्व संरक्षित मंदिर बाबत पुरातत्त्व विभागाकडे माहिती मागविली होती. त्यावर पुरातत्त्व विभागाने मंदिर संरक्षणाचे अनेक उपायही सुचविले आहेत. या मंदिराला दररोज सरासरी पन्नास हजार ते एक लाख भाविक भेट देतात. सण उत्सवात ही संख्या चार लाखांपर्यंतही जाते. पुरातत्त्व विभागाने मंदिर प्रशासनाकडे या मंदिरातील म्युझियम तसेच अन्य प्रेक्षणीय स्थळाच्या संरक्षणासाठी मंदिर व्यवस्थापनाने पुरातत्त्व विभागाला फंड द्यावा तसेच पुरातत्त्व विभागाचे महासंचालक अथवा प्रतिनिधी ट्रस्ट बोर्डावर सदस्य म्हणून घ्यावा असे सुचविले असून, भाविकांच्या फायद्याचे निर्णय घेताना कोणत्याही कृतीमुळे मंदिराच्या पुरातत्त्वाला बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी असेही म्हणणे मांडले आहे.
