मुंबई हल्ल्यातील दोषींवर पाकिस्तानकडून योग्य ती कारवाई नाही – हिलरी क्लिंटन

नवी दिल्ली, दि. ७ – मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानने योग्य कारवाई केली नसल्याचा आरोप अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी सोमवारी केला आहे. २००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या दहशतवाद्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असे त्या म्हणाल्या.  तीन दिवसीय भारत दौर्‍यावर असून रविवारी क्लिंटनचे भारतात आगमन झाले.
    पाकिस्तानमधील १० दहशतवाद्यांनी २००८ साली मुंबईतील ताज हॉटेल, सी. एस. टी रेल्वे स्थानक आदी ठिकाणी क्रूर दहशतवादी हल्ला केला होता. या हल्ल्यात परदेशी नागरिकांसहित १६६ जण ठार झाले होते. यातील एक दहशतवादी अजमल कसाब यास ताब्यात घेण्यात आले. या हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप लष्कर-ए-तैय्यबाचा संस्थापक हाफिज सईदवर आहे. अमेरिकेने गेल्या महिन्यात ‘रिवॉर्डस फॉर जस्टिस’ या कार्यक्रमाअंतर्गत सईदला पकडण्यासाठी त्याच्याबाबत माहिती देणार्‍यास आणि त्याच्यावर खटला चालवण्यासाठी मदत करणार्‍यास एक कोटी डॉलर्सच्या बक्षिसाची घोषणा केली होती. त्याचसोबत, दहशतवादी हाफिज अब्दुल रहमान मक्कीवर २० लाख डॉलर्सचे इनाम जाहीर केले होते.
    याबाबत कारवाई करण्यासाठी भारत आणि अमेरिकेने पाकिस्तानला वारंवार बजावून सुद्धा पाकिस्तानी सरकारने अद्यापही ठोस भूमिका घेतलेली नाही. या हल्ल्याशी संबंधित सर्वांनाच शिक्षा व्हावी, असे अमेरिकेला वाटते असे क्लिंटन म्हणाल्या.
    आण्विक शस्त्रास्त्रांबाबत बोलताना हिलरी म्हणाल्या, `आण्विक शस्त्रास्त्र प्रसार ही जगातील सर्वात मोठी समस्या आहे. तसेच इराण संपूर्ण जगासाठी धोकादायक आहे. आण्विक शस्त्रास्त्रे निर्माण करण्याची जी शर्यत सुरू आहे ती देखील अंततः नुकसानकारकच आहे.’ ही शस्त्रास्त्रे दहशतवाद्यांच्या हाती लागल्यास पुढे काय होणार, ही सर्वात मोठी चिंता जगाला भेडसावत असल्याचे त्यांनी सांगितले.
    दरम्यान रविवारी कोलकातामध्ये दाखल झालेल्या क्लिंटन यांनी सोमवारी राज्य सचिवालय असलेल्या रॉयटर्स इमारतीत पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी ममतांशी सुमारे २० मिनिटे चर्चा केली. पूर्व भारतात उद्योगांच्या विकासासाठी अनेक संधी असल्याचे मत हिलरी यांनी यावेळी व्यक्त केले. हिलरी यांनी प.बंगालमध्ये गुंतवणूक करण्याचे आश्‍वासन दिल्याचे ममता यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही आयटी क्षेत्रात गुंतवणुकीला प्राधान्य द्यावे यावर भर दिला. हिलरी यांनीही यास सकारात्मक प्रतिसाद दिला असेही ममता म्हणाल्या.