
नवी दिल्ली, दि.७- – प्रस्तावित राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्र (एनसीटीसी) इंटेलिजन्स ब्युरो (आय.बी.) या केंद्रीय गुप्तचर संस्थेच्या अखत्यारित ठेवणार नसल्याचे संकेत केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम् यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री परिषदेदरम्यान शनिवारी देशभरातील प्रमुख राज्यांचे मुख्यमंत्री व केंद्र सरकार यांच्यात झालेल्या खडाजंगीनंतर केंद्र सरकारने घेतलेली ही नरमाईची भूमिका पाहता या प्रश्नी काँग्रेस पक्ष एकाकी पडल्याचे मानले जात आहे.
रविवारी मुख्यमंत्री परिषदेच्या समारोपाच्या भाषणामध्ये चिदंबरम् यांनी एनसीटीसी ला गुप्तचर संस्थेच्या नियंत्रणात ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या प्रस्तावावर पुन्हा फेरविचार केला जाईल, असे आश्वासन दिले. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी केलेल्या भाषणांचा संदर्भ चिदंबरम् यांनी यावेळी दिला. एनसीटीसीला सर्वच वक्त्यांचे समर्थन आहे. मात्र ही संस्था आय.बी.च्या नियंत्रणाखाली असण्याला या सर्वच मुख्यमंत्र्यांनी विरोध केला होता.
एनसीटीसीबाबत निश्चित धोरण ठरविण्यासाठी आपण खुल्या मनाने या परिषदेत सहभागी झालो होतो, असे चिदंबरम् म्हणाले. संपूर्ण देशाला भेडसावणार्या दहशतवादाचा सामना करण्यासाठी एनसीटीसी अतिशय उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या परिषदेत सर्वच मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनांचा केंद्र सरकार विचार करेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
