मुंबई किंग्ज ठरणार

मुंबई, दि. ५ – मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स रविवारी एकमेकांसमोर वानखेडे स्टेडियमवर उभे ठाकणार आहेत. मुंबईच्या संघाने गेले २ सामने जिंकत अव्वल चार संघांमध्ये धडक मारली आहे. त्यांचे १० सामन्यात सहा विजयांसह १२ गुण आहेत. परिणामी या संघाचे मनोबल उंचावलेले आहे.
    रविवारी मुंबईला आपल्या घरच्या मैदानावर विजयाची हॅट्ट्रीक साधण्याची संधी आहे. मुंबईच्या गेल्या दोन सामन्यात त्या मानाने कमी धावा पहावयास मिळाल्या.  मात्र रविवारच्या सामन्यात चेन्नईसमोर मुंबईचा खरा कस लागेल. मुंबईचा फ्रँकलीन हा अष्टपैलू खेळाडू चांगली कामगिरी करीत आहे. तर रोहीत शर्मा, अंबाती रायडू यांनीही उपयुक्त खेळी साकारल्या आहेत. मलिंगा मुंबईसाठी नेहमीच फायद्याचा असल्याचे सिद्ध झाले आहे. सचिन – फ्रँकलीन ही सलामीची जोडी मुंबईला विजय मिळवून देण्याच्या जिद्दीनेच मैदानात उतरेल.
    तर सलग दोन वेळा आयपीएल स्पर्धा जिंकणारा चेन्नई संघ या हंगामात ११ सामन्यामध्ये केवळ पाच विजय साकारून ११ गुणांची कमाई करू शकला आहे. गेल्या सामन्यात डेक्कनवर विजय मिळवत धोनीने आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखविली. संघाचा सलामीवीर ड्यूप्लॅसिसही सध्या चांगल्या फॉर्मात आहे. सुरेश रैनाही वेगवान खेळी साकारत आहे. मधल्या फळीत धोनी आणि या हंगामातील सर्वात महागडा खेळाडू रविंद्र जडेजा संघासाठी उपयुक्त कामगिरी बजावताना दिसत आहेत. अष्टपैलू मॉर्नी मॉर्केल संघाच्या गरजेच्या वेळी हातभार लावत आहे. त्यामुळे रविवारचा सामना नक्कीच ऍक्शनपॅक होईल!