
पुणे, दि. ५ – देशात ६०४ विद्यापीठे आणि ३५ हजार महाविद्यालये आहेत. हे सर्व महाविद्यालये व विद्यापीठे ‘नॅशनल नॅड नॉलेज नेटवर्किंगने’ जोडण्याचे काम सुरू असून, ते लवकरच पूर्ण होणार आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला कोणत्याही विद्यापीठातील किंवा महाविद्यालयातील प्राध्यापक व अधिकारी यांच्याशी थेट संवाद साधता येणार आहे. अशी माहिती मानव संसाधन आणि कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी दिली.
भारतीय जैन संघटना रौप्य महोत्सवी वर्ष उद्घाटन समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, कर्नाटक येथील धर्मस्थळ मंजुनाथ टेम्पलचे धर्माधिकारी डॉ. विरेंद्र हेगडे, माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतीलाल मुथ्था आदी उपस्थित होते.
देशातील २ हजार ५०० ग्रामपंचायती फायबर ऑप्टीकने जोडल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी कोणताही विषय एकाच ठिकाणी बसून शिकू शकतो. येत्या ५ ते ६ वर्षात विद्यार्थ्यांचा दप्तराचे ओझे कमी होणार असून, आकाश टॅब घेऊन मुले शाळेत जातील. अशी माहिती सांगत सिब्बल म्हणाले, देशात २२ कोटी मुले शाळेत जातात, ५५ लाख शिक्षक आहेत. ६ लाख शिक्षक कमी आहेत. असे असताना शालेय शिक्षणानंतर विद्यापीठाचे शिक्षण घेण्यार्यांची संख्या तुलनेने खुपच कमी असून, १०० विद्यार्थी शालेय शिक्षण घेत असतील तर त्यातील फक्त १७ विद्यार्थी विद्यापाठाचे शिक्षण घेत आहे. जागतिक स्तरावर शंभरामागे ६०-७० मुले विद्यापीठाचे शिक्षण घेतात.
भारतातील ही स्थिती बदलण्यासाठी प्रयत्न सुरू असून, २०२० पर्यंत १०० विद्यार्थ्यांमागे ३० विद्यार्थी विद्यापीठाचे शिक्षण घेतील असा प्रयत्न राहाणार आहे. त्यामुळे भविष्यात (२०२० मध्ये) ८०० ते ९०० अधिक विद्यापीठे आणि ५० हजाराहून अधिक महाविद्यालये तयार करावी लागणार आहेत. यासाठी खाजगी संस्थांची मोठी मदत होणार असून, भारतीय जैन संघटनेने यामध्ये साथ द्यावी असे सिब्बल यांनी सांगितले. शाळेच्या चार भिंतीच्या बाहेरच खरे शिक्षण मिळते. मात्र, आपल्या देशात शाळेच्या चार भिंतीमध्ये विद्यार्थ्यांच्या विचाराला व सुप्त गुणांना दाबले जात आहे. ज्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या परिवर्तनासाठी होत नसेल ते शिक्षण काय कामाचे, विद्यार्थ्यांना लहानपणापासून चांगले शिक्षण व संस्कार मिळाले, तरच देश पुढे वाटचाल करू शकेल. पिण्याचे पाणी व आरोग्याचा प्रश्न हे आपल्यापुढील मोठे आवाहन अहे. या प्रश्नांना शिक्षणाशी जोडल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही असे मत सिब्बल यांनी व्यक्त केले.
`इग्रजी शाळांमध्ये होणारा काळाबाजार रोखण्यासाठी एक विधेयक तयार करण्यात आले असून, हे विधायक केंद्रीय मंत्रालयाकडे पाठवण्यात आले आहे यावर विचार व्हावा.’ अशी दर्डा यांनी यावेळी सिब्बल यांना विनंती केली. महाराष्ट्र कॉपीमुक्त झाला आहे. महाराष्ट्रात एक ‘मास्टर प्लान’ तयार करण्यात आला असून, याला महाराष्ट्र मंडळाने संमती दिली आहे. या प्लानमध्ये प्राथमिक शाळा १ किलोमीटर अंतरावर, माध्यमिक शाळा ३ किलोमीटर अंतरावर तर उच्च माध्यमिक शाळा ५ किलोमीटरच्या अंतरामध्ये असणार आहेत. भारतीय जैन संघटना बीड जिल्ह्यातील पाचशे शाळांमध्ये मुल्यवर्धनचे धडे देते, त्याचप्रमाणे सर्व शाळांमध्ये मुल्यवर्धनचे धडे देणे आवश्यक आहे. मुथ्था म्हणाले, शहरांमध्ये लहान वयातच मुलांमध्ये गुन्हा करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भविष्यातील तरूण पीढी कशी असेल यावर विचार करणेही भितीदायक आहे. त्यामुळेच संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील पाचशे शाळांमधील ३५ हजार विद्यार्थ्यांना ‘मुल्यवर्धन’ या विषयाचे धडे पहिलीपासून दिले जात आहे. संघटनेच्या वतीने लहानपणापासून मुलांमध्ये संस्कार रूजवण्याचे काम सुरू आहे. यावेळी डॉ. विरेंद्र हेगडे, चंद्रशेखर धर्माधिकारी यांची भाषणे झाली.
