
नवी दिल्ली, दि. ५ – हिंदू मंदिरांचे शासनातर्फे अधिग्रहण करणे किवा भाविकांनी देणगी स्वरूपात दिलेल्या निधीचा वापर अन्य धर्मियांसाठी करणे म्हणजे हिंदू समाजाचा विश्वासघात आहे. हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा विश्व हिदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय संघटन मंत्री दिनेश चंद्र यांनी दिला.
देशाच्या राजधानीत देशभरातील प्रमुख हिंदू देवस्थांनांच्या विश्वस्तांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दिनेश चंद्र बोलत होते.मंदिरांवर जबरदस्तीने नियंत्रण मिळविण्याचा किवा संस्थांनांची संपत्ती सरकारी तिजोरीत जमा करण्याच्या धोरणाबाबत सरकारने पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचीन काळापासून मंदिरे समाजाच्या आस्था व विश्वासाची केंद्रे आहेत. या मंदिरांचे कुशल व्यवस्थापन करून त्यांना समाजकेंद्रे बनविण्याची काळाची गरज आहे, असे दिनेश चंद्र यांनी स्पष्ट केले.
हिदूंची श्रद्धास्थाने असलेले संत, साहित्य आणि मंदिरे यावर सध्या चोहोबाजूंनी हल्ले होत असल्याचे सनातन धर्म प्रतिनिधी सभेचे अध्यक्ष स्वामी राघवानंद यांनी नमूद केले. या मेळाव्यास महामण्डलेश्वर स्वामी अनुभूतानंद, विहिपचे उपाध्यक्ष ओमप्रकाश सिंह, महामंत्री चंपत राय यांच्या समवेत देशभरातील ६० प्रमुख मंदिरांचे व्यवस्थापक उपस्थित होते.
