युपीएससीचा निकाल जाहीर

केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या निवड परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या परीक्षेच्या माध्यमातून आयोगाने ९१० विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी समाधानकारक कामगिरी बजावल्याचे निकालावरून दिसत आहे. या परीक्षेत हरियाणाच्या शेना अग्रवाल या विद्यार्थीनीने देशभरातून प्रथम क्रमांक पटकवला असून, अमृतेश औरंगाबादकर याने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे. निकिता पवार ही महाराष्ट्रातून दुसरी आली आहे.

अतिशय कठीण आणि मर्यादीत निकाल असणार्‍या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंदा मुलींनी वर्चस्व गाजवल्याचे दिसत आहे. पहिल्या तीन क्रमांकामध्ये शेना अग्रवाल हिने प्रथम आणि रुक्मिणी रियार हिने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर मुलांमध्ये प्रिन्स धवन याने देशभरातून तिसरा क्रमांक पटकावला आहे. पहिल्या दहा क्रमांकामध्ये चार मुली आणि सहा मुलांचा समावेश आहे. महाराष्ट्रात अगस्थानी असलेला अमृतेश औरंगाबादकर हा देशभरातून दहाव्या क्रमांक पटकावला आहे. त्याने पहिल्याच प्रयत्नात या अवघड समजल्या जाणार्‍या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले आहे. तर महाराष्ट्रातून दुसरी आलेली निकीता पवार देशातून अठरावी आली आहे.