भारतातील निम्मे सोने विदेशी बँकेत रिझर्व्ह बॅकेचा बेकायदेशीर उपद्व्याप

पुणे, दि. २ – भारताकडे एकूण जेवढे सोने आहे, त्या पाचशे सत्तावन्न टन सोन्यापैकी दोनशे छप्पन्न टन सोने रिझर्व बँकेने ब्रिटनमधील बँक ऑफ लंडन आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट या बँकेत बेकायदेशीरपणे ठेवले आहे. हे सोने परत आणण्यासाठी न्यायालयाने रिझर्व्ह बॅकेला भाग पाडावे , अशा मागणीच्या एका जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेस नोटीस बजावली आहे. वरील जनहितयाजिका करणारे श्री. रघुनाथ केळकर हे पुण्यातील व्यावसायिक आहेत. यापूर्वीही त्यांनी केंद्र सरकारच्या अर्थिक धोरणावर टीका करणारी जनहित याचिका दाखल केली होती.
    सध्या ही जनहित याचिका न्या. डी. डी. सिन्हा व न्या. विजया ताहिलरामामी यांच्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी आहे. रिझर्व्ह बँक जनतेच्या व्यवहाराच्या सोयीसाठी ज्या कागदी नोटा छापते त्याला रिझर्व्ह बँकेतील सोने हे तारण असते. सध्या बाजारपेठेत दहा दहा कोटी रुपयांच्या नोटा चलनात आहेत. प्रत्यक्षात बँकेकडे एक लाख कोटी रुपये किंमतीचे सोने आहे. ते सुमारे पाचशे सत्तावन्न टन आहे. त्यातील पंचाऐशी टक्के सोने हे रिझर्व्ह बँकेकडेच असले पाहिजे, असा नियम आहे; पण रिझर्व्ह बॅकेने सुमारे पन्नास टक्के सोने ब्रिटनमधील बँकातून ठेवले आहे ते बेकायदेशीर तर आहेच पण तो व्यवहार धोक्याचाही आहे, अशी शंका श्री. रघुनाथ केळकर यांनी व्यक्त केली आहे.
    ते म्हणाले, हे सोने रिझर्व्ह बँकेने सुरक्षेच्या कारणास्तव अन्य देशाच्या बँकेत ठेवले आहे, असे रिझर्व्ह बँकेचे उत्तर आहे. पण ज्या बँकेत हे असे सोने ठेवायचे त्या बँकेची तेवढे सोने सांभाळण्याची पत हवी. पूर्वी बँका नसत तेंव्हा काशी रामेश्वरच्या यात्रेला जाताना घरातील महत्वाचा ऐवज विश्वासातील सावकारकडे ठेवण्याची पद्धत होती. पण त्या सावरकारची क्षमता व विश्वासार्हता तेवढी महत्वाची असे. सध्या बॅक ऑफ इंग्लंडची क्षमता आणि विश्वासार्हता तेवढी आहे का, हा प्रश्न आहे. एक म्हणजे ब्रिटनकडे सध्या सगळे मिळून तीनशे टन सोने आहे, यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे वीस वर्षापूर्वी चंद्रशेखर पंतप्रधान असताना जागतिक बाजारपेठेत पेट्रोल डिझेल घेण्यासाठी जी विदेशी चलन भारताला हवे होते तेंव्हा बँकेने अतिशय अपमानास्पद भूमिका घेऊन भारताला अधिकाधिक सोने त्या बँकेत भरण्यास भाग पाडले होते.
    जगभर सध्या महत्वाचे देश मोठया प्रमाणावर सोने साठवत आहेत. चीनने भारताच्या अपेक्षित चलनक्षमतेच्या दहा लाख कोटी रुपये अनेक पटींनी सोने जमविले आहे. जगात सध्या सोन्याचा उपयोग अर्थिक आघाडीवर स्फोटकासारखा केला जातो. अशावेळी भारताने सोने विदेशात ठेवणे हे अतिशय आक्षेपार्ह मानले जात आहे.