
मुंबई, दि. २ – देशामध्ये तयार होणार्या वस्त्र प्रावरणांना लॅटीन अमेरिका व आफ्रिका या बाजारपेठांतून मागणी वाढत आहे. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात वस्त्रांच्या निर्यातीमध्ये २० टक्क्यांनी वाढ होवून १६ अब्ज डॉलर्सची कमाई होईल, असा अंदाज ऍपरल एक्पोर्ट प्रमोशन कॉन्सिल (एईपीसी) ने व्यक्त केला आहे.
देशातील वस्त्रांसाठी यूरोप व अमेरिका या पारंपारिक बाजारपेठा आहेत. मात्र गेल्या वर्षी अमेरिकेत निर्माण झालेला आर्थिक पेच आणि युरोपातील कर्ज संकटामुळे वस्त्रांच्या निर्यातीवरही विपरित परिणाम झाला. साहजिकच यामुळे निर्यातदारांना नव्या बाजारपेठांचा शोध घेणे फार निकडीचे झाले होते. सरकार व निर्यातदारांनी नवी बाजारपेठ शोधण्यासाठी केलेले संयुक्त प्रकल्प चालू आर्थिक वर्षात निर्यात वाढीसाठी चांगलेच फलदायी ठरणार आहेत. अमेरिका, इंग्लड, जर्मनी व फ्रान्स या पारंपारिक बाजारपेठांबरोबरच प्रामुख्याने दक्षिण अमेरिका, जपान व इस्त्रायल या नव्या बाजारपेठांतून भारतीय वस्त्र प्रावरणांना वाढलेल्या मागणीमुळे निर्यातीत वाढ होणार आहे.
निर्यातीच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण असले, तरी देशातील वस्त्रप्रावरण निर्मिती उद्योगांसमोर अनेक आव्हाने उभी असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगार, सुरक्षा व आरोग्य निकषांमुळे उद्योगाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात टिकाव धरायचा असल्यास या आव्हानांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता आहे.
