सकारात्मक मानसिकता ठेवून काम करण्याची गरज – हर्षवर्धन पाटील

पुणे, दि. २८ – प्रत्येक क्षेत्रात काही नकारात्मक बाजू असतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करुन सकारात्मक मानसिकता ठेवून काम करीत राहणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा राज्याचे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केली.
वरुणराज भिडे पुरस्कारा’चे वितरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात ‘महाराष्ट्र टाईम्स’चे प्रतिनिधी कुमार कदम यांना ‘वरुणराज भिडे पुरस्कार’ने,  ‘आयबीएन लोकमत’च्या पत्रकार सुवर्णा दुसाणे – जगदाळे, ‘लोकसत्ता’चे पत्रकार अभिजीत घोरपडे आणि कोल्हापूर लोकमतचे विश्‍वास पाटील यांना ‘वरुणराज भिडे आश्‍वासक पत्रकारिता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी आमदार उल्हास पवार, संस्थेचे अध्यक्ष वि. अ. जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर होते. २५ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे मुख्य पुरस्काराचे तर पाच हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे ‘आश्‍वासक पुरस्कारा’चे स्वरुप आहे. वरुणराज भिडे मित्रमंडळाच्या वतीने हे पुरस्कार देण्यात आले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात काही नकारात्मक बाजू असतात. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करुन सकारात्मक मानसिकता ठेवून काम करीत राहणे गरजेचे आहे. पत्रकारांनी एखादी बातमी छापत असताना त्याची दुसरी बाजू देणे आवश्यक आहे. ब्रेकिंग न्यूज ही एखाद्याच्या आयुष्यासाठी ब्रोकन न्यूज ठरु शकते. त्यामुळे केवळ संख्यात्मक वाढ न करता दर्जात्मक, गुणात्मक आणि वस्तूनिष्ठपणा मोजण्याची गरज आहे. समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकारांनी करायला हवे.
गिरीश कुबेर म्हणाले, आजच्या पत्रकारितेचे स्वरुप गंभीर आहे. सध्याच्या पिढीमध्ये स्वयंशिस्त तसेच अभ्यासाचा अभाव दिसून येतो. या व्यवसायाचे केवळ मनोरंजनीकरण झाले आहे. बदलत्या काळाबरोबर वृत्तपत्रांनी तसेच पत्रकारांनी बदलणे आवश्यक आहे. केवळ बातमीपुरते मर्यादित न राहता बातमीपलिकडील माहिती देण्याचा प्रयत्न करायला हवा. अन्यथा आजची पत्रकारिताच कालबाह्य होण्याचा धोका आहे.