कर्नाटकमधील तीन माजी मुख्यमंत्र्यांविरुध्द तक्रारींची नोंद

विजापूर, दि. २८ – कर्नाटक राज्यातील बेकायदेशीर खाण उपसा प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. खाण गैरव्यवहारामुळे येडियुरप्पांना मुख्यमंत्रीपद गमवावे लागले होते. परंतु राज्याच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांविरुध्द खाण गैरव्यवहाराच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
    एस. एम. कृष्णा, धमरसिंग  आणि एच. डी. कुमारस्वामी या तीन माजी मुख्यमंत्र्यांविरुध्द केंद्रीय उच्चस्तरीय समितीकडे टी. जी. अब्राहम यांनी अधिकृत तक्रार नोंदवली आहे. राज्यातील अरण्यांची जमीन खाण कामासाठी उपयोगात आणू नये, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सॅम फिरोज भरुचा यांनी २००० साली दिली होती. परंतु या सूचनेचे पालन करण्यात आले नाही अशी तक्रार व संबंधित कागदपत्रे काल केंद्रीय उच्चस्तरीय समितीसमोर सादर करण्यात आली.
    एस. एम. कृष्णा हे १९९९ ते २००४ पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या काळात अरण्याची राखीव जमीन खाण उद्योगास देण्यात आली. सन २००२ मध्ये अरण्याच्या काही जमिनींची नोंद बदलून तेथे खाण व्यवसाय करण्यास परवनागी देण्यात आली, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.
     धरमसिंग मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्य सरकारचे २३ कोटी रुपयांचे नुकसान झाले. कुमार स्वामींच्या काळात नियम मोडून खाण उपसा करण्यात आला. टी. जी. अब्राहम यांनी राज्याच्या लोकायुक्तांकडे वरील तीन मुख्यमंत्री आणि ११ सनदी अधिकार्‍यांविरुध्द तक्रार नोंदवली आहे. आता त्यांनी केंद्रीय उच्चस्तरीय समितीमध्येही तक्रार दाखल केली आहे. खाण व्यवहारात सर्वच राजकीय पक्षांचे मुख्यमंत्री अडकल्याचे स्पष्ट झाल्याचे राज्यात खळबळ उडाली आहे.