
मुंबई, दि. २७ – राज्यात नद्या आणि धरणांची पाण्याची पातळी खोल गेली असून, टंचाईग्रस्त ९ जिल्ह्यांत ८४६ गावे आणि ४ हजार ३३८ वाड्यांमध्ये ९३५ टँकर चालू आहेत. या जिल्ह्यांत वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सर्वत्र टंचाईग्रस्त परिस्थिती जाहीर करावी आणि ५० टक्के आणेवारीची अट शिथिल करावी. तसेच १०० टक्के हागणदारी मुक्तीची अट ८० टक्के करावी, अशी मागणी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली.
दरम्यान, पाणीटंचाईची इतकी भीषण परिस्थिती असून सरकारकडे योग्य आकडेवारी उपलब्ध नसल्याचे विदारक चित्र शुक्रवारी पहायला मिळाले. राज्यात भीषण पाणीटंचाई असली तरी किती टँकर अजून आवश्यक आहेत, नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी काय योजना हाती घेतल्या आहेत, याची निश्चित आकडेवारी अजून सरकारकडे नाही. केवळ विभागवार बैठका घेतल्या जात असल्याचे चित्र दिसत आहे.
राज्यात १९७२ आणि २००३ च्या दुष्काळापेक्षा सध्या भिषण स्थिती असून पूर्णपणे या ९ जिल्ह्यातील नद्या कोरडया आहेत. दुर्गम भागात टँकर येत नाहीत. यासाठी टँकरचे बिल वाढवून द्यावे, अशी मागणी पाणीपुरवठा मंत्र्यांनी केली. सध्या टँकरचे भाडे १६ रूपये २० पैसे प्रती कि.मी. आहे. १२०० पाणीपुरवठा पंप गावागावांत दिले गेले आहेत. अजून एक हजार पाण्याचे पंप देणार असल्याचे ढोबळे यांनी सांगितले.
सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातुर, धुळे, नगर, नाशिक या जिल्ह्यांत पाणीटंचाईची भीषण परिस्थिती आहे.
